Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका निवृत्त सैनिकाने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. या माजी सैनिकाने स्वच्छता कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या गाडीवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्याचा या व्यक्तीचा आक्षेप होता. त्याचा विरोध करण्यासाठीच या व्यक्तीने गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीप्रमाणे कचरा गोळा करणारी गाडी परिसरामध्ये दाखल झाली. या गाडीवर 'गाड़ी वाला आया जरा कचरा निकाल' (Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal Song) हे गाणं लावण्यात आलं होतं. तसेच गाडीवर 'स्वच्छ भारत अभियाना'संदर्भातील गाणीही वाजवली जात आहेत. मात्र अशाप्रकारे गोंगाट करत रोज येणाऱ्या कचरा गाडीवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांना या व्यक्तीचा विरोध होता. याच नाराजीमधून त्याने गाडीच्या दिशेने गोळीबार केला. या व्यक्तीने गोळीबार केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण केली. त्यानंतर या व्यक्तीला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार गाझियाबादमधील लोनीमध्ये घडला. 


गाणं बंद कर असं सांगितलं


साफसफाई कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी मुस्तफाबाद कॉलिनीमधून फिरत होते. याच परिसरातील कांचन पार्क कॉलीनीमध्ये ही गाडी कचरा गोळा करण्यासाठी गेली. या निवृत्त सैनिकाच्या घरासमोर ही गाडी आली तेव्हा त्याने गाडीवर वाजत असलेल्या ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ गाण्याला विरोध केला आणि गाणं बंद कर असं चालकाला आणि त्याच्या सहाय्यकाला सांगितलं.


थेट गोळीबार


ही व्यक्ती गाडीवर सुरु असलेलं गाणं बंद करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांवर ओरडली. मात्र त्यानंतरही गाणी बंद झाली नाहीत तेव्हा या व्यक्तीने थेट या गाडीच्या दिशेने घरातील बंदुकीमधून 2 ते 3 गोळ्या झाडल्या. साफसफाई कर्मचारी या गोळीबारामधून थोडक्यात बचावले. मात्र यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला गोळा होण्यास सुरुवात झाली. या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी करु लागले. 


पोलिसांच्या ताब्यात


काही कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी या व्यक्तीला मारहाण करत थेट पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. परवाना असलेल्या बंदुकीमधून हा गोळीबार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या व्यक्तीला रिमांडमध्ये पाठवण्यात आलं आहे. अशाप्रकारे केवळ एक गाणं वाजवलं म्हणून थेट गोळीबार केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.