Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...
Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.
Retired Police Officer Shoots Son In Law: पंजाब पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका सहाय्यक महानिरीक्षकाने (एआयजी) शनिवारी दुपारी चंदीगड जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्येच आपल्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्ती ही सनदी अधिकारी असून ते भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) अधिकारी म्हणून कार्यरत होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. मार्च महिन्यामध्ये पंजाब पोलीस सेवेतून एआयजी (मानवाधिकार सेल) मधून निवृत्त झालेल्या 58 वर्षीय मलविंदर सिंग सिद्धू यांना या जावयाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर मरण पावलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचं नाव हरप्रीत सिंग असं असून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात नवी दिल्लीत येथे ते कार्यरत होते.
वॉशरुमला जाण्यासाठी बाहेर पडले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरप्रीत आणि त्याची पत्नी डॉ. अमितोज कौर यांच्यात वैवाहिक वाद सुरु आहेत. हरप्रीतने मानसिक आणि शारीरिक छळाचं कारण देत गेल्या वर्षी चंदीगड जिल्हा न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. अमितोज कॅनडाला गेलेल्या असल्याने त्यांच्यावतीने त्यांचे वडील मलविंदर न्यायालयीन कामकाजासाठी कोर्टामध्ये हजर होते. शनिवारी (3 ऑगस्ट रोजी) दोन्ही कुटुंब मध्यस्थीच्या चौथ्या फेरीसाठी चंदीगड जिल्हा न्यायालयामध्ये हजर होते. याचवेळी मलविंदर यांनी मध्यस्थी केंद्रात दुपारी 2 वाजता गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना फोनवरुन मिळाली. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हरप्रीत वॉशरूममध्ये जाण्यासाठी खोलीतून बाहेर पडला तेव्हा मलविंदर त्याच्या मागे गेले. ते दोघे बाहेर कॉरिडॉरमध्ये आले असता मालविंदरने जावयावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपीने स्वत:ला दुसऱ्या खोलीत कोंडून घेतले आणि नंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोन गोळ्या लागल्या
हरप्रीत दोन गोळ्या लागल्या. हरप्रीतला चंदिगडमधील पीजीआयएमईआरमध्ये नेण्यात आलं असता जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. “दुपारी 2 च्या सुमारास, आम्हाला सेक्टर 43 मधील जिल्हा न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली. प्राथमिक तपासात हरप्रीत सिंग आणि डॉ अमितोज कौर यांच्यात वैवाहिक वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. 2023 पासून घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवण्यात आले होते,” वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कंवरदीप कौर यांनी सांगितले. “आज, मध्यस्थी म्हणून न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थीद्वारे दोन्ही कुटुंबांचं समोपदेशन केलं जात होतं आणि ही दोन्ही कुटुंबांमधील चौथी बैठक होती. हरप्रित, त्याचे वडील आणि आई हजर होत्या. तर मालविंदर यांच्यासोबत त्याचे वकील होते,” कौर यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> 'त्याने माझी शॉर्ट्स फाडली अन्..', पावसात भिजण्याचा आनंद घेताना छेडछाड; पोलिसांची पीडितेलाच दमदाटी
पिस्तूल घेऊन कोर्टात शिरलेच कसे? शस्त्र परवान्याचं काय?
पोलिसांनी आरोपीकडून एक 0.32 बोअर पिस्तूल जप्त केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. “आम्ही घटनास्थळावरून झाडलेल्या 4 गोळ्या आणि 3 जिवंत गोळ्या जप्त केल्या असून गुन्हा करण्यासाठी ज्या शस्त्राचा कथितपणे वापर केला गेला त्याची देखील तपासणी केली जाणार आहे. हे परवानाधारक शस्त्र होते का? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रथमदर्शनी, दोन गोळ्या लागल्याने हरप्रीतचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. शवविच्छेदनानंतर पुढील समविस्तर माहिती समोर येतील,” एसएसपी कौर यांनी दिली आहे. आरोपी पिस्तूल घेऊन न्यायालयाच्या आवारात कसे घुसले याचाही तपासही पोलीस करत आहेत. “मालविंदरने शस्त्रासह इमारतीत प्रवेश कसा मिळवला याचा तपास सुरू आहे. ज्या मजल्यावर ही घटना घडली तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पण आम्ही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहोत,” असं कौर यांनी सांगितलं.
नेमका वाद काय?
मालविंदर यांची कन्या अमितोजशी हरप्रीतने 19 जुलै 2020 रोजी लग्न केले होते. हे हरप्रीतचे दुसरे लग्न होते, असे पोलिसांनी सांगितले. हे जोडपे सुमारे 2 महिने एकत्र राहत होते. हरप्रीतच्या आधीच्या लग्नाची माहिती आम्हाला नव्हती, असा दावा अमितोजच्या कुटुंबीयांनी केला आहे. अमितोजने 2020 मध्ये मोहाली येथे हरप्रितविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केलेली. जानेवारी 2021 मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. त्याला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर त्याला सोडून देण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंनी नंतर न्यायालयाबरोबरच पोलिसांकडे एकमेकांविरोधात याचिका आणि तक्रारी दाखल करण्यात आलेल्या.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
मालविंदर यांच्याविरोधात मोहालीमध्ये यापूर्वीच दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी पंजाब पोलिसांच्या मानवाधिकार कक्षात त्याची नियुक्ती असताना त्याच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी 25 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाच्या चौकशी करणाऱ्या दक्षता विभागाच्या पोलिस उपअधीक्षकालाही त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. ऑडिओ रेकॉर्डिंगचा हवाला देऊन, दक्षता विभागाने त्याच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या वेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि या वर्षी जानेवारीमध्ये त्यांना अटक झाली होती. त्यानंतर याच वर्षी 31 मार्च रोजी मालविंदर न्यायालयीन कोठडीत असताना निवृत्त झाले. 10 एप्रिल रोजी त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली होती.