पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलापुढचं संकट वाढत आहे. ७० दिवसात आरजेडीच्या १२ आमदार आणि एमएलसीने पक्ष सोडला आहे. या सर्व नेत्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडी-यू) मध्ये प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्वी यादव यांच्याच समन्वयाचा अभाव आणि तिकिट न मिळल्याचं कारण देत नेत्यांनी पक्ष सोडला आहे. लालू यादव तब्बल तीन वर्षे तुरूंगात आहेत. पक्षाचे काम फक्त तेजस्वी यादव पाहत आहेत. अशा परिस्थितीत, जुने नेते आणि त्यांच्यात सहज चर्चा होत नाही. इतकेच नव्हे तर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत तेजस्वी यादव यांचे मतभेद देखील होतात. यामुळेच नाराज झालेले रघुवंश प्रसाद सिंह यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.


तेजस्वी यांची कार्यशैली अनेक नेत्यांना पटत नाही. बऱ्याच वेळा त्यांची भेट होत नाही. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहित नाही. दुसरीकडे महाआघाडीतील नेते देखील तेजस्वी यांच्यावर नाराज आहेत.


नुकतेच जीतन राम मांझी यांनी देखील महाआघाडीची साथ सोडली आहे. ते आता एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांना पुन्हा जवळ आणण्यात नितीश कुमार यांना यश आलं आहे. ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो. 


२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या अनेक नेत्यांना लालू यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या कंदील या निवडणूक चिन्हावर लढण्यास सांगितले होते. त्यामुळे आता हे नेते आरजेडी सोडणे स्वाभाविक आहे. ज्यांनी पक्ष सोडला त्यामध्ये अनेक आमदार आहेत जे मूळचे जेडीयूचे आहेत.


महेश्वर यादव म्हणाले की, 'आरजेडी आता फक्त नावाला गरिबांचा पक्ष राहिला आहे. येथे केवळ भांडवलदारांचेच वर्चस्व आहे. पक्षात गरीब, मजुरांना जागा नाही.'


दुसरीकडे लालू यादव यांच्या कुटुंबाची स्थिती देखील पक्षावर परिणाम करत आहे. लालू यादव तुरुंगात आहेत. मोठा मुलगा तेजप्रताप हे आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणत असतात. दुसरीकडे अशी चर्चा आहे की, तेजप्रताप यादव यांनी आधीच जवळच्या लोकांना तिकिट देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दुसरीकडे त्यांचे सासरे यांनी देखील पक्षाकडून फारकत घेतली आहे. आता तेजप्रताप यांनी पत्नी ऐश्वर्या देखील निवडणूक लढवणार असल्य़ाचं बोललं जात आहे. त्यामुळे आता कौटुंबिक वाद हा राजकीय वादात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.