नवी दिल्ली - आधीच चारा घोटाळ्यावरून तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे.  तेजप्रताप यादव यांच्यावर पक्षातील इतर अनेक नेत्यांनी अविश्वास दाखवला आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांना त्यांनी आपला नेता म्हणून स्वीकारले आहे. यामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात नेतृत्त्वावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरजेडीचे नेते भाई वीरेंद्र यांनी म्हटले आहे की, आमचे नेते दोनच आहेत. एक लालूप्रसाद यादव आणि दुसरे तेजस्वी यादव. जर कोणी आम्हाला सहयोग करत असेल, तर हरकत नाही. पण सध्या अशी कोणतीही बाब नाही आणि भविष्यातील रणनिती नंतरच ठरविण्यात येईल. 


लालूप्रसाद यादव कोणाकडेही पक्ष नेतृत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात. पण आमचे नेते तेजस्वी यादवच आहेत. २०१९-२० मधील निवडणूक जिंकून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करणे, हेच आमचे लक्ष्य असल्याचे पक्षाचे नेते राहुल तिवारी यांनी सांगितले. 


पक्ष नेतृत्त्वावरून आरजेडीमध्ये वाद असल्याचे उघड झाल्यावर जनता दल युनायटेडने त्यांच्यावर टीका केली. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, तेजप्रताप यांच्याकडे आरजेडीचे नेतृत्त्व का दिले जाऊ शकत नाही. ते लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रताही लालूप्रसाद यादव यांच्यापेक्षा जास्त आहे. निवडणूकही ते अधिक मतांनी जिकले आहेत. जर आरजेडीच्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी तेजप्रताप यांचा विरोध करून दाखवावा. 


पक्षाचे नेतृत्त्व आपल्याकडे दिल्यास ते सांभाळण्यास आपण सक्षम असल्याचे तेजप्रताप यादव यांनी सोमवारी म्हटले होते. सोमवारी ते पाटण्यातील पक्षाच्या कार्यालयात जाऊन लालूप्रसाद यादव यांच्या कक्षात बसले होते. तिथेच त्यांनी जनता दरबारही घेत लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तेजस्वी यादव याच्याशी माझे कोणतेही मतभेद नाहीत. काहीजण चुकीचा प्रचार करीत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.