बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बसपा, एमआयएमसह 6 पक्षांची तिसरी आघाडी
एनडीए आणि महाआघाडीला बिहारमध्ये तिसरा पर्याय
पटना : बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे एनडीए आणि महाआघाडी यांच्यात ही थेट निवडणूक होत असली तरी अनेक प्रादेशिक पक्ष देखील यावेळी बिहारच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. एनडीए आणि महाआघाडी झाली असताना बिहारमध्ये आता कुशवाहा यांनी मायावती आणि असदुद्दीन ओवैसी यांना सोबत घेऊन तिसऱी आघाडी बनवली आहे.
राज्यात आता आणखी एक नवी आघाडी तयार झाली आहे. जी सरळ-सरळ NDA आणि महाआघाडीला आव्हान देणार आहे. गुरुवारी RLSP प्रमुख उपेंद्र कुशवाहा आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नव्या आघाडीची घोषणा केली. नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या विरोधात या आघाडीत बहुजन समाज पक्ष देखील सहभागी झाली आहे.
या तिसऱ्या आघाडीला ग्रँड डेमोक्रेटिक सेकुलर फ्रंट असं नाव देण्यात आलं आहे. ज्यामध्ये एकूण 6 पक्षांचा समावेश आहे. ज्यामध्ये RLSP, AIMIM, BSP, समाजवादी जनता दल (डेमोक्रेटिक), जनतांत्रिक पार्टी (सोशलिस्ट), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांचा समावेश आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, 'या फ्रंटचे संयोजक देवेंद्र यादव राहणार आहेत.'
तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं की, 'आम्हाला आनंद आहे की आम्ही बिहारच्या जनतेला नवा पर्याय देत आहोत. नीतीश सरकारच्या काळात 15 वर्षात बिहारच्या जनतेला फक्त धोका मिळाला आहे. आता नव्या पर्यायांची गरज आहे. बिहारच्या जनतेने भाजप, जेडीयू आणि आरजेडीला पाहिलं आहे. आता नव्या आघाडीला संधी मिळाली पाहिजे.'
राष्ट्रीय लोक समता पार्टी (RLSP) ने गुरुवारी पहिली 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.