हायवेवर नवीन दहशत: `ते` पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग...
Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
Police Fraud News In Marathi: राजस्थानच्या डूंगरपुर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुवैतमधून आलेल्या 5 युवकांना दरोडेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे, दरोडेखोर पोलिसांच्या वर्दीत होते तसंच, नाकेबंदीच्या नावाखाली कार थांबवून 20 ग्रॅम सोने आणि 3 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांना तक्रार दाखल केली असून याप्रकरणी शोध सुरू आहे.
पावटा घाटात हा लूटमारीचा प्रकार घडला आहे. बांसवाडा जिल्ह्यातील परतापुर येथे राहणारे 5 तरुण कुवैत येथे नोकरी करतात. हे पाचही जण कुवैतहून भारतात आले असून त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. संध्याकाळी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर एका प्रायव्हेट कारने ते परतापूर येथे जात होते. तेव्हा रात्री साधारण 12 वाजताच्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांनी त्यांची कार थांबवली.
रस्त्यावर पोलिसांच्या वर्दीत चार तरुण उभे होते. त्यांनी कार थांबवून तपासणी करण्यास सुरुवात केली. तपासणीच्या बहाण्याने त्यांनी तरुणांचे सामान लूटले. आरोपींनी त्यांच्याकडून जवळपास 250 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि 3 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली आहे. या घटनेनंतर तरुणांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनीही तक्रार दाखल करुन तपास सुरू केला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, राजस्थानात आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळं संपूर्ण राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाच बनावट पोलिस नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच पोलिसांना शोध घेणे अवघड झाले आहे. पोलिसांचा वेष धारण करुन एनआरआय युवकांकडून लाखो रुपयांचे दागिने आणि रक्कम लुटल्यामुळं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास लागला नसून पोलिस अरोपींचा शोध घेत आहेत.