नवी दिल्ली : श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या एका चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. इरफान नावाचा हा चोर दिल्लीतल्या पॉश कॉलनींमध्ये चोरी करायचा आणि या पैशांमधून गावातल्या गरीब मुलींची लग्न लावून द्यायचा तसंच हेल्थ कॅम्पही आयोजित करायचा. असं असलं तरी शहरामध्ये इरफान श्रीमंतांचं आयुष्य जगत होता. इरफानकडे महागड्या गाड्या आणि ब्रॅण्डेड कपडे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान हा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातल्या एका गावचा राहणारा आहे. गावामध्ये इरफानची ओळख सामाजिक कार्यकर्ता म्हणून होती. दिल्ली पोलीस इरफानला पकडायला त्याच्या गावाला गेली तेव्हा गावकऱ्यांनी त्याला अटक करायला विरोध केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान गावात आणि शहरामध्ये वेगळी आयुष्य जगत होता. गावामध्ये तो कुर्ता आणि पायजमा घालायचा तर शहरात असताना ब्रॅण्डेड कपडे घालायचा आणि महागड्या गाड्यांमधून फिरायचा. भोजपुरी चित्रपटातील एक अभिनेत्री त्याची गर्लफ्रेंड असल्याचंही कळतंय.


इरफाननं दिल्लीतल्या फ्रेंड्स कॉलनी, जामीया नगर आणि लाजपत नगर भागामध्ये काही महिन्यांमध्येच १२ चोऱ्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.