नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती खोऱ्याला देशाला जोडणारा रोहतांग पास शनिवारी पर्यटकांसाठी खुला झालाय. हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास हा धाडसी पर्यटकांना आणि ट्रेकर्सना नेहमीच आकर्षित करत राहिलाय. जवळपास १३ हजार फुटांवर स्थित रोहतांग पास गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या बर्फवृष्टीनंतर बंद करण्यात आला होता. रोहतांग पास खुला झाल्यानं हिमाचलमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी मनाली पोहचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसते. उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी बर्फाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथं दाखल होतात.


रोहतांग पास

वाहनासाठी परमिट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनाली - लेह हायवे 'बायकर्स'साठी आकर्षण आहे. मनालीहून लेह-लडाखला जाण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे पोहचतात. मनालीमध्ये अनेक बाईक भाड्यानंही मिळतात. यासाठी प्रती दिवसाचं शुल्क आकारलं जातं. वाहनाचं परमिट मिळवण्यासाठी तुम्हाला rohtangpermits.nic.in (टूरिस्‍ट डेवलपमेंट काउंसिल ऑफ मनालीची वेबसाईट) या वेबसाईटवर जाऊन परमिट विंडो उघडावी लागेल. त्यानंतर ज्या वाहनानं तुम्हाला तिथं जायचंय त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन क्रमांक आणि तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक यामध्ये अपलोड करावा लागतो. त्यानंतर ऑनलाईन फी भरावी लागते. परमिटसाठी ५०० रुपये शुल्क आकारलं जातं. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच वेबसाईटवर ही परमिट विंडो चालू असते. 


मनाली लेह हायवे

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार, प्रत्येक दिवशी रोहतांग पासकडे केवळ १२०० वाहनं प्रवास करू शकतात. यात ८०० पेट्रोल वाहनं आणि ४०० डिझेल वाहनांचा समावेश आहे. 


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या बर्फवृष्टीनंतर बंद करण्यात आलेला रोहतांग पास यावर्षी १९ मे रोजी वाहनांसाठी खुल करण्यात आला. परंतु, पर्यटकांसाठी मात्र हा रस्ता १ जूनपासून खुला झालाय. 


रोहतांग पास

मनालीहून लेहकडे जाताना रोहतांग पास लागतो. मनालीपासून जवळपास ५२ किलोमीटर दूर हा घाटाचा रस्ता आहे. इथं तुम्हाला टॅक्सी आणि बस सेवाही उपलब्ध आहे. 


१३,०५० फुटांवर असलेल्या रोहतांग पासवर सध्या ५ ते २० फूट उंच बर्फ जमा झालेला दिसतोय. गाड्या आणि बसपेक्षाही इथल्या बर्फाची उंची जास्त आहे.