पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि उपमंत्र्यांना संसदेत बोलावण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे ते म्हणाले आहेत की, मालदीव सरकारने भारताची अधिकृतपणे माफी का मागितलेली नाही? याशिवाय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमंत्र्यांना त्यांच्या पदावरुन का काढण्यात आलेलं नाही?


नरेंद्र मोदी यांनी लक्षद्धीपमधील पर्यटन वाढवण्याच्या हेतून केलेल्य  दौऱ्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. टीका झाल्यानंतर त्यांनी या पोस्ट डिलीट केल्या होत्या. पण वाद इतका वाढला होता की, तिन्ही मंत्री मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद यांना निलंबित करण्यात आलं होतं. 



डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीन यांनी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना संसदेत बोलावण्याच्या मागणीवर जोर देत म्हटलं की, तिन्ही मंत्र्यांच्या विधानामुळे भारत आणि मालदीवमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही शेजारी देशांच्या नात्यात आतापर्यंत कधीच आला नाही इतका दुरावा आला आहे. मोठ्या संख्येने भारतीय टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट मागील 48 तासात झालेल्या बुकिंग रद्द करत आहेत. 


पुढे ते म्हणाले की, "मालदीव सरकारने पुरेशी कारवाई केल्याचं मला वाटत नाही. या वादामुळे दोन्ही देशात मागील अनेक काळापासून सुरु असलेल्या संबंधांवर मोठा प्रभाव पडू शकतो. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. याशिवाय मालदीवमधील लोक वैद्यकीय आणि इतर पायाभूत सुविधांसाठीही भारतावर फारसे अवलंबून आहेत".


दरम्यान मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तेथील संसदीय अल्पसंख्यांक नेते अली अजीन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मोहम्मद मुइज्जू यांना सत्तेवरुन हटवण्याचं आवाहन सर्व नेत्यांना केलं आहे. देशाचं परराष्ट्र धोरण स्थिर असावं यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अली अजीम म्हणाले आहेत. 


मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक


भारतातून मोठ्या संख्येने पर्यक मालदीवमध्ये जात असतात. 2023 मध्ये एकूण 17 लाख 57 हजार 939 पर्यटक मालदीवला गेले होते. यातील सर्वाधिक संख्या भारतीयांची होता. भारतातील 2 लाख 9 हजार 198 पर्यटक तिथे गेले होते. भारतानंतर रशिया आणि चीनमधील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. 


यापूर्वी 2022 मध्ये 2.41 लाख भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते, 2021 मध्ये 2.91 लाख आणि 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळातही 63000 भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते.