लखनऊ: समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोडलेल्या सरकारी बंगल्याचे जवळपास १० लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारला सादर केला आहे. या बंगल्यातील टाईल्स, नळ, सुभोभीकरणासाठी वापरण्यात आलेली झाडे, लाईटस्, प्रसाधनगृहातील वस्तू, स्वीमिंग पूल या भागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अखिलेश यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची व्यवस्थितपणे पाहणी करुन नुकसानीचा अहवाल सादर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिलेश यादव यांनी २ जूनला बंगला सोडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतरही अखिलेश यांना या बंगल्यात राहता यावे, यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला सामान्य माणसाप्रमाचे नियम लागू होतात, असे सांगत न्या. रंजन गोगोई यांनी अखिलेश यांना फटकारले होते. 


यानंतर अखिलेश यादव यांनीही त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. बंगल्यातील अनेक वस्तू आपण स्वखर्चाने विकत घेतल्याचा दावा अखिलेश यांनी केला होता. त्यामुळे मी त्या वस्तू माझ्यासोबत नेल्या. परंतु विरोधकांकडून माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत असल्याचे अखिलेश यांनी सांगितले होते.