नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीला अजूनही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या गोष्टीची खमंग चर्चा सुरु आहे. यापूर्वी माजी राष्ट्रपती व काँग्रेस नेते प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावरुन बराच गदारोळही झाला होता. अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रणब मुखर्जींच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता संघाने निमंत्रण दिल्यास राहुल गांधी कार्यक्रमाला जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'भारताचं भविष्य: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' या विषयावरील परिसंवादात सरसंघचालक मोहन भागवत बोलणार आहेत. या कार्यक्रमाला संघ राहुल गांधी आणि माकप नेते सीताराम येचुरी यांना आमंत्रण देणार असल्याचे समजते. 


काही दिवसांपूर्वीच लंडन येथील कार्यक्रमात राहुल गांधींनी संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेशी केली होती. त्यावरुन भाजप नेते बरेच आक्रमक झाले होते.