राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे `या` महिला फळीविषयीच्या खास गोष्टी माहितीयेत?
महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणारी ही संघटना...
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसची वेगळी आणि नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाहीच. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आरएसएसच्या विचारसरणीवर आणि संघाने आखलेल्या मार्गावर चालणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे.
देशाच्या राजकीय पटलावरही आरएसएसला अतिशय महत्त्वं दिलं जातं. अनेक वर्षांपासून या संघाला देशात विशेष दर्जा प्राप्त आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस साजरा केला जातो. अशा या संघाच्या स्थापना दिवसाप्रमाणेच दसऱ्याच्याच दिवशी आणखी एका संघटनेचा स्थापना दिवसही असतो. ती संघटना म्हणजे राष्ट्र सेविका समिती.
महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणारी ही संघटनाही तशी खास आहे. जवळपास आरएसएसप्रमाणेच विचारांचा प्रचार करणाऱ्या या संघटनेतचा व्यास दिवसागणिक वाढतच आहे. या संघटनेकडे आरएसएसची महिला तुकडी म्हणूनही पाहिलं जातं. या संघटनेत फक्त स्त्रीवादालाच नव्हे, तर स्त्री किंवा महिला साऱ्या देशाचा पाया आहेत या विचारसरणीचा महत्त्वं दिलं जातं.
अशी झाली स्थापना...
१९२५ मध्ये दसऱ्याच्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची स्थापना झाली. तर, राष्ट्र सेविका समितीची स्थापनाही दसऱ्याच्याच दिवशी, १९३६ मध्ये वर्धा येथे झाली. महिलांना शिक्षण घेणं तर दूरच, पण घरबाहेर पडण्याचीही मुभा नव्हती अशा काळात ही संघटना स्थापण्यात आली होती. हिंदू महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याकडे संघटनेचा कल असे. या संघटनेत लक्ष्मीबाई केळकर यांना अनन्यसाधारण महत्त्वं आहे.
सर्वात मोठी हिंदू महिला संघटना
सध्याच्या घडीला साऱ्या विश्वात या संघटनेकडे सर्वात मोठी हिंदू महिला संघटना म्हणून पाहिलं जातं. भारतीय संस्कृतीचं जतन करण्यावरही या संघटनेकडून भर दिला जातो. ज्याच्या जवळपास ५ हजार २१५ शाखा आहेत. जवळपास १० लाख महिलाय राष्ट्र सेविका समितीशी जोडल्या गेल्या आहेत. स्वसंरक्षणासाठी महिलांना सक्षम करण्यासोबतच साहित्य- संस्कार केंद्र, निशुल्क शिक्षण अशा विविध सुविधा पुरवण्यासाठी या संघटनेचा पुढाकार असतो.
आरएसएस संस्थापक आणि सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात आल्यानंतर लक्ष्मीबाई केळकर यांनी जेव्हा या संघटनेची स्थापना केली तेव्हापासून १९७८ पर्यंत त्या राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका होत्या. लक्ष्मीबाईंपासून सुरु झालेल्या या प्रवासात पुढे सरस्वतीबाई आपटे, ऊषा ताई, प्रमिला ताई अशी नावंही जोडली गेली. आजच्या घडीला शिक्षिका, वकील, अधिकारी आणि अतरही विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला या संघटनेशी जोडल्या गेल्या आहेत.