मोदी ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केले नसते- मायावती
नरेंद्र मोदी यांचा हा आरोप अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे.
लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय (ओबीसी) म्हणवून घेत आहेत. मात्र, मोदी खरंच ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान होऊन दिले असते का? कल्याण सिंह यांच्यासारख्या नेत्याची संघाने काय अवस्था केली, हे संपूर्ण देशाने पाहिले नाही का, असा जळजळीत सवाल 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. येत्या १२ तारखेला उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या जागांसाठी मतदान होईल. त्यामुळे सध्या येथील प्रचाराला कमालीची रंगत चढली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. यावेळी मायावतींनी सपा-बसपची महाआघाडी जातीयवादी असल्याचा नरेंद्र मोदींचा आरोप फेटाळून लावला. मायावती यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचा हा आरोप अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. जातीयवादाच्या शापामुळे पीडीत असणारे लोक जातीयवादी कसे असू शकतात? मोदी ओबीसी नसल्यामुळे त्यांना कधीही या परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. त्यामुळेच ते अद्वातद्वा बोलत असल्याची टीकाही यावेळी मायावती यांनी केली.
तसेच मोदींनी महाआघाडीवर टीका करण्याऐवजी गुजरातमधील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. मला समजले आहे की, त्याठिकाणी दलितांना सन्मानाने जगता येत नाही. त्यांच्यावर अन्याय केले जातात. तसेच सध्या भाजप नेत्यांकडून ज्याप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत त्यावरून मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी नरेंद्र मोदींचे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची स्वप्नही पूर्ण होणार नाही, असे मायावती यांनी सांगितले.