तिरुनअनंतपुरम : आरटीओ अधिकारी असल्याने त्याला मुलगी देण्यासाठी मुलीच्या वडिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात त्याला एक मुलगी आवडली. मुलीच्या वडिलांनीही आपल्या मुलीला काही कमी पडू नये, असंच सर्व केलं. पण लग्नानंतर अवघ्या ३ महिन्याने त्यांना त्यांची मुलगी सोडून गेली, कारण त्यांच्या मुलीने आत्महत्या केली होती. मुलीने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यामागे कारणंही तसंच होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण तिच्या आरटीओ अधिकारी पतीकडून तिचा सतत छळ होत होता, मारहाण होत होती. तिच्या शरीरावरील मारहाणीच्या खुणा तिने अनेकवेळा आपल्या बहिणीला पाठवल्या होत्या. विस्मया नायरचा विवाह आरटीओमधील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक किरणकुमारशी मार्च २०२१ मध्ये झाला होता.


खरंतर आरटीओत अधिकारी असणाऱ्या किरणला जीवनाचा प्रवास कसा करायचा आणि जीवनाच्या प्रवासात अत्यंतजवळचा सहप्रवाशी कोण आहे, कुणासोबतचा प्रवास अधिक सुखदायक असेल हेच कळलं नाही.


विस्मयाला तिच्या वडिलांनी सासरी पाठवताना सर्वकाही दिलं होतं, सोन्यांपासून पैशांपर्यंत सर्वकाही दिलं. पण किरणकुमारच्या मनात १० लाखाची गाडी अशी ठसली की त्याने विस्मयाला गाडीसाठी १० लाख आणण्यासाठी त्रास देणे सुरु केले. यासाठी तिला एवढा त्रास दिला की तिला माहेरी जाणे भाग पडलं.


विस्मया देखील बीएएमएसच्या शेवटच्या वर्षाला होती, तिचं वय अवघं २२ वर्ष होतं. शेवटच्या परीक्षेच्या नावाने विस्मयाला किरणकुमारने घरी म्हणजेच सासरी बोलवून घेतलं. आई-वडिलांच्या इच्छेविरोधात पुन्हा एकदा किरणकुमारवर विश्वास ठेवून ती सासरी परतली.


पण किरणकुमारच्या मनातून ती १० लाखाची गाडी अजूनही घर करुन होती. किरणकुमारने तिच्या पालकांशी बोलण्यावर देखील बंदी आणली. एवढंच नाही तर परीक्षेसाठी परीक्षा फी देखील दिली नाही. अखेर विस्मयाला परीक्षा फी तिच्या आईकडून मागून घ्यावी लागली.


त्या रविवारची रात्र विस्मयासाठी खूप भयानक ठरली. तिला किरणकुमारने मारहाण केली, पैशांची मागणी त्याने अधिक तीव्र केली, मारहाणीच्या खुणांचे फोटो तिने आपल्या बहिणीला देखील पाठवले. विस्मयाच्या कुटूंबियांसाठी तो धक्का होता, ते तिला घ्यायला निघाले, तितक्यात त्यांना फोन आला की ती रुग्णालयात दाखल आहे तुम्ही या.


मात्र ते जेव्हा विस्मयाच्या सासरी पोहोचले तेव्हा समजले विस्मयाने आत्महत्या केली आहे, ती त्यांना कायमची सोडून गेली आहे. आईवडीलांकडे रडण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. अखेर विस्मयाच्या बहिणीने विस्मयाने पाठवलेले मेसेज आणि मारहाणीचे फोटो पोलिसांना दिले आणि त्याने आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप तिने केला आहे. अखेर किरणकुमारला पोलिसांनी अटक केली आहे.