बाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला
Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...
मुंबई Russia-Ukraine War:: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारपेठेत चांगलाच दिसून आला. भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्री दिसून आली. ग्लोबल बाजारांमधील नकारात्मक संकेत आणि युक्रेनवर रशियाचा हल्ला यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केली. सेन्सेक्स 2700 जास्त अंकांनी घसरून बंद झाला तर, तर निफ्टी देखील 800 अंकांनी गडगडला. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धास्ती भारतीय गुंतवणूकदारांनीही घेतली.
त्यामुळे आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांच्याशी खास संवाद साधताना मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ या...
मार्केट एक्स्पर्ट्स आणि हेलिओस इंडियाचे सीईओ दिनशॉ इराणी म्हणाले की, अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सकारात्मक राहायला हवे. रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती फार काळ अशीच राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये.
इराणी म्हणतात की, घसरणीनंतरही शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळणे शक्य आहे. घसरणीमुळे घाबरण्याची गरज नाही. फक्त युद्धानंतरच्या महागाईसाठीही तयार राहायला हवे.
गुंतवणूकदारांनी एसआयपी थांबवू नये
मार्केट एक्स्पर्ट्स व्हीके शर्मा यांनी म्हटले की, बाजारातील मंदी 2-3 सत्रांत संपताना दिसेल. बऱ्याचदा असे होते की, मार्केट घसरल्यास सामान्य गुंतवणूकदार आपले शेअर्स विकतात. परंतू स्मार्ट गुंतवणूकदार योग्य वेळेची वाट पाहत गुंतवणूक सुरू ठेवतो.
मार्केट एक्स्पर्ट्स शर्मा म्हणाले की, तुम्ही गुंतवणूकदार असाल तर SIP अजिबात थांबवू नका आणि शेअर्स विकू नका. उलट योग्य वेळ पाहून गुंतवणूक वाढवा.