Russia Ukraine वादाचा भारतीयांना असा फटका; निवडणुकांनंतर दिसणार मोठे बदल
Russia Ukraine Conflict | Russia Ukraine crises | crude oil price | UP election 2022 | रशिया आणि युक्रेनदरम्यान तणावाचा परिणाम जगभरातील बाजारांवर होत आहे. कच्चे तेल आणि सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.येत्या काही दिवसात या किंमती आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत.
मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील वाढलेल्या तणावामुळे मंगळवारी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट-इंडेक्स्ड कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $95 च्या वर पोहोचली आहे, जी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आहे.
किमती वाढल्याची कारणे
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रांतात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर किंमती वाढू लागल्या आहेत. सोमवारी रशियाने पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांना वेगळा देश म्हणून मान्यता दिल्याने सर्वत्र विरोध होत आहे. रशियाच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेने मॉस्कोवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
भारतावर परिणाम
रशिया हा जगात कच्चे तेल आणि सोन्याचा अव्वल उत्पादक देश आहे. अशा स्थितीत त्यावर बंदीचा परिणाम जागतिक पुरवठ्यावर होत आहे. कच्चे तेल आणि सोन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारतावरही याचा परिणाम होईल.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशांतर्गत किंमती वाढू शकतात आणि महागाई वाढू शकते. एआयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, भू-राजकीय तणावामुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती तेजीसह व्यवहार करीत आहेत.
सोने आणि तेल महाग होणार
अनुज गुप्ता म्हणाले की, सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. तेलाच्या किमती लवकरच 100 ते 105 डॉलरच्या पातळीवर पोहचू शकतात.
सध्या निवडणुकीच्या वातावरणामुळे तेलाच्या किमती वाढल्या नसून, निवडणुका संपताच दर वाढण्याचा अंदाज गुप्ता यांनी वर्तवला आहे.