मुंबई : राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. रामनवमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी रामजन्मभूमी मंदिराच्या कामाला ट्रस्टनं सुरूवात करावी तसंच पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या कार्याचं भूमीपूजन व्हावं आणि तेच योग्य ठरेल असं शिवसेनेचं मुखपत्र सामनात म्हटलंय. त्याचबरोबर राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते मुलायमसिंह यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांसह देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांना बोलवायला हवं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील या इतर नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण देण्यास काय हरकत आहे? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांची मोदींसोबतची दिल्लीतील ही पहिलीच भेट आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची चर्चाही नसताना शिवसेनेचं मुखपत्रं सामनात राम मंदिराबाबतच्या अग्रलेखात ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे-मोदी भेटीत या विषयावर चर्चा होणार का? याची उत्सुकता आहे.


दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची मोदींशी ही दुसरी भेट आहे. याआधी पुण्यात पंतप्रधान आले असताना दोघांची  विमानतळावर भेट झाली होती. पण ती फक्त काही मिनिटांपुरतीच होती. आता दोघांची सविस्तर भेट होणार आहे. यावेळी राज्याला मिळणाऱा निधी आणि महापूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.