नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शबरीमाला मंदिरातील प्रवेशासंदर्भात दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याचे मान्य केले. त्यानुसार येत्या २२ जानेवारीला या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ४९ याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीस खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आलेली नाही. त्यामुळे सध्या शबरीमाला मंदिरात महिलांना जाण्याची मुभा कायम असल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले. 


सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने ४-१ अशा बहुमताने शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी करण्यात येत होती.


मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतरही भक्तांनी महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यास प्रखर विरोध दर्शवला होता. यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्यामुळे केरळमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.