मुंबई : Sabarimala Row केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. पण, या मुद्द्यावर वक्तव्य करणं त्यांना काहीसं महागात पडल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुम्ही रक्ताने माखलेला सॅनिटरी नॅपकीन घेऊन मित्राच्या / नातेवाईकांच्या घरी जाता का? तर मग मंदिरात का जाता?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं. 'ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशन अँड ऑब्झर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशन'तर्फे आयोजित परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. 


इराणी यांना या वक्तव्यानंतर अनेकांच्याच रोषाचा सामनाही करावा लागला होता. ज्यानंतर त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं. 


'माझ्या वक्तव्यावर बरेचजण प्रतिक्रिया देत असल्यामुळे आता मी स्वत:च माझ्या वक्व्यावर प्रतिक्रिया देत आहे', असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं. 


'एक हिंदू म्हणून झोराष्ट्रीयन व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मला प्रार्थना करण्यासाठी अग्यारीमध्ये जाण्याची परवानगी नाही', असं म्हणत 'फारसी समुदायाचा आणि त्यांच्या धर्मप्रचारकांचा मी आदर करते. केवळ दोन झोराष्ट्रीयन मुलांची आई आहे म्हणून प्रार्थनेच्या हक्कासाठी मी न्यायालयाकडे धाव घेतलेली नाही', याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 



'मुळात मासिक पाळीच्या वेळी पारसी किंवा पारसी समुदायातील नसलेल्या कोणत्याच महिला अग्यारीत जात नाहीत', मग त्यांचं वय कितीही असो, असं त्या ट्विट करत म्हणाल्या. 


ही दोन्ही वास्तवदर्शी विधानं असून आता ज्या इतर चर्चा रंगत आहेत, त्यातून गैरसमजच परसलवला जात असल्याची बाबही त्यांनी इथे अधोरेखित केली. 


आपल्या वक्तव्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून ही बाब आपल्याला थक्क न करता उलटपक्षी आपल्या मनात कुतूहल निर्माण करत आहे की महिला म्हणून मी स्वत:चं मत मांडण्यास मी स्वतंत्र नाही  हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला. 'पण, ज्यावेळी माझ्याकडून उदारमतवादी दृष्टीकोन मांडला जातो तेव्हा तो स्वीकारार्ह असतो. हा कसला उदारमतवाद?', असा थेट प्रश्नही त्यांनी टीकाकारांसमोर ठेवला. 




इराणी यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण आणि त्यांनी मांडलेले विचार पाहता आता यावर कोणत्या प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जावा असा निर्णय दिला होता. पण, काही संघटना आणि भाविकांकडून या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला. 


अतिशय तणावग्रस्त परिस्थितीमध्ये मासिक पूजेसाठी खुल्या करण्यात आलेल्या शबरीमला मंदिराच्या दिशेने निघालेल्या महिलांवर, महिला पत्रपकारांवरही हल्ला झाल्याची बाब उघड झाली. ज्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं.