मंदिर शुद्धीकरणानंतर शबरीमलाचे दरवाजे उघडले
शबरीमला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते.
केरळ : केरळमधील शबरीमला मंदिरात पहाटे 3 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान दोन महिलांनी प्रवेश केला. या दोन महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचून पूजाअर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर देशभरातून प्रतिक्रीया उमटू लागल्या. 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेश नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही भाविक आणि कट्टर हिंदुत्ववादी महिलांना प्रवेश देण्यास जोरदार विरोध करत आहेत. आज पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या दोन साधारण चाळीशीच्या महिलांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते.
लाईव्ह अपडेट
महिला प्रवेशानंतर बंद करण्यात आलेले मंदिराचे दरवाजे भाविकांच्या प्रवेशासाठी पुन्हा उघडण्यात आले आहेत.
'आम्ही मध्य रात्री मंदिरात प्रवेश केला. पोलीस सुरक्षा न घेताच आम्ही पुढे चालू लागलो. कोणीही आम्हाला विरोध केला नाही. तिथे भक्त होते पण कोणी आमचा रस्ता अडवला नाही. आम्हाला कोणीही प्रश्न विचारला नसल्याचे' कनकदुर्गा यांनी 'न्यूज 18' ला सांगितले.
गेल्या 800 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाची घटना घडली. एएनआय वृत्तसंस्थेन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला. यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रीया येऊ लागल्या. हिंदू कट्टरतावाद्यांनी या घटनेचा निषेध केला.
कट्टरतावाद्यांचा विरोध
महिलांसोबत पोलिसांची तुकडी देखील होती अशी माहिती समोर येत आहे. पोलीस कर्मचारी वर्दीत आणि साध्या वेशात त्यांच्या सोबत होते. एएनआयने यासंदर्भातील व्हिडीओ समोर आणलाय. याआधी 23 डिसेंबरला 11 महिलांच्या घोळक्याने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना विरोध करण्यात आला. सेल्वी यांच्या नेतृत्वाखाली या प्रवेशाचा प्रयत्न झाला. भक्तांनी त्यांना रोखून त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडले.
प्रशासन निर्णयासोबत
केरळ राज्य शासनाने शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचीही हमी दिली आहे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जाण्याच्या याचिका सुनावणीप्रकरणी केरळ राज्यशासन कोणतीही पुनरावलोकन याचिका दाखल करणार नाही. आम्ही शबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांना सर्व सोयीसुविधा आणि सुरक्षितता पुरवण्याची हमी देतो', असे केरळ शासनातर्फे सांगण्यात आले होते. केरळ आणि शेजारी राज्यातील महिला सुरक्षा रक्षक आणि पोलीस यंत्रणांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांची मंदिर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे.