पायलट यांनी जाहीरपणे फडकावले बंडाचे निशाण, ३० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा
जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली
नवी दिल्ली: राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाविरोधात बंडांचे निशाण फडकावल्यानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. आज सकाळपासून दिल्लीत असूनही प्रसारमाध्यमांशी संवाद न साधलेल्या सचिन पायलट यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पायलट यांनी सोमवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून हा दावा करण्यात आला आहे. तसेच आपल्याकडे काँग्रेसच्या ३० आमदारांचे पाठबळ असून अशोक गेहलोत सरकार अल्पमतात गेल्याचा दावाही पायलट यांनी केला आहे. सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून हा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, सचिन पायलट यांना काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळण्याचीही शक्यता आहे.
Rajasthan crisis: सचिन पायलटांनी राहुल गांधींची भेट टाळली; काँग्रेसचे सरकार पडणार?
दरम्यान, काहीवेळापूर्वीच जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला ७५ आमदार उपस्थित असल्याचे समजते. या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री गेहलोत दिल्लीवरून आलेल्या अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्याशी चर्चा करणार आहेत. हे तिन्ही नेते मिळून उद्या राजस्थानमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीची रणनीती ठरवणार आहेत.
सचिन पायलट यांच्यासाठी ज्योतिरादित्य सिंधियांचं ट्विट, म्हणाले...
सोमवारी सकाळी १०.३० वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. यानंतर काँग्रेसकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो. दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला.
राजस्थान विधानसभेतील पक्षीय बलाबल
राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे. तसेच काँग्रेस सरकारला १३ अपक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे गेहलोत सरकारकडे एकूण १२१ आमदारांचे संख्याबळ आहे. तर राजस्थान विधानसभेत भाजपचे ७२ आमदार आहेत. बहुमतासाठी लागणारा १०१ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला २९ आमदारांची गरज आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्या दाव्याप्रमाणे त्यांच्याकडे ३० आमदारांचे पाठबळ असेल तर राजस्थानमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येऊ शकते.