नवी दिल्ली : राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा वाद आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज झालेले उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना भेटायला बोलावलं आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादावर काहीच महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'माझा एकेकाळचा सहकारी सचिन पायलट यालाही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्रास देऊन बाजूला काढलं, हे पाहून मला दु:ख होतंय. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमता यांना काँग्रेसमध्ये फार कमी महत्त्व आहे, हे यावरून दिसत आहे,' असं ट्विट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे.
Sad to see my erstwhile colleague, @SachinPilot too, being sidelined and persecuted by Rajasthan CM, @ashokgehlot51 . Shows that talent and capability find little credence in the @INCIndia .
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 12, 2020
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मार्च महिन्यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मध्यप्रदेशमधलं कमलनाथ यांचं काँग्रेस सरकार पडलं आणि शिवराजसिंग चव्हाण यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर सचिन पायलट हेदेखील ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मार्गानेच जाणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
भाजपकडून घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता. सरकार पाडण्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने जो FIR दाखल केला आहे. या प्रकरणात २ भाजप नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे. राजस्थानच्या एसओजीनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळाल्यामुळे सचिन पायलट नाराज झाले आहेत.
२०१८ साली राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा होती. पण गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं. तरीही सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातले वाद कमी होत नसल्याचंच चित्र राजस्थान काँग्रेसमध्ये आहे.