जयपूर: सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये Rajasthan Crisis सुरु झालेले सत्तानाट्य आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. काहीवेळापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. पायलट यांच्या जागी गोविंदसिंह डोटासरा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान : सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी

काँग्रेसच्या या कृतीला सचिन पायलट यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सचिन पायलट यांनी सोशल मीडियावरून आपल्या प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. आता यानंतर सचिन पायलट काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कालपर्यंत सचिन पायलट यांच्या निकटवर्तीयांकडून ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे सांगितले जात होते. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे पायलट यांच्या परतीचे सर्व दोर कापले गेल्याची चर्चा होती. ही शक्यता आज खरी ठरताना दिसत आहे. आता काँग्रेस पायलट यांची पक्षातूनही हकालपट्टी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाल्यास सचिन पायलट काय करणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 



सचिन पायलट यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री रमेश मीणा आणि समर्थक विश्वेंद्र सिंह यांचीही मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्त्वाला डावलले जात असल्याची टीका केली होती. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या रुपाने भाजप तरुण रक्ताला वाव देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.