सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घर वापसी, पक्षाकडून मिळणार मोठं पद
१ महिन्याच्या बंडखोरीनंतर पायलट पुन्हा परतणार
नवी दिल्ली : सुमारे महिनाभराच्या बंडखोरीनंतर सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये परतणार आहेत. सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने एक समिती गठीत केली आहे, जी सचिन पायलट यांच्या सर्व समस्या सोडवेल. या आश्वासनांमुळे सचिन पायलट यांनी बंड मागे घेण्याचे मान्य केले असून लवकरच त्यांना काँग्रेसमध्ये एक मोठं पद मिळू शकतं.
सचिन पायलट हे आज दुपारी 4 वाजेपर्यंत जयपूरला पोहोचतील. सचिन पायलट सुमारे एक महिन्याच्या बंडखोरीनंतर राजस्थानला परतत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे देखील जैसलमेरला पोहोचतील. सर्व आमदार जिथे मुक्कामी आहेत, तेथे काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर चर्चा होईल.
सोमवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सचिन पायलट आणि त्यांचे सहकारी आमदार यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी सर्व आमदार जयपूरला जाऊ शकतात. म्हणजेच 14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनापूर्वी काँग्रेसने आपले सरकार वाचवले आहे. दुसरीकडे काँग्रेस हायकमांडने अशोक गहलोत यांच्याशीही चर्चा केली.
सचिन पायलट सहमत कसे?
राहुल आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरी पक्षाने पद दिले तरी ते परत घेऊ शकतात. आम्ही स्वाभिमानाची लढाई लढत होतो. दरम्यान, आता सचिन पायलट यांना सन्माननीय पद देण्याबाबत पक्षात मंथन सुरु आहे. त्यांना कोणतं पद दिलं जाणार याबाबत आता उत्सूकता आहे.
अशा परिस्थितीत अशोक गहलोत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री राहतील, परंतु सचिन पायलटच्या जवळच्यांना मंत्रिमंडळात मोठे पद मिळू शकेल. याशिवाय सचिन पायलट यांना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन मिळाले आहे.
महत्त्वपूर्ण म्हणजे विधानसभा अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, पायलट गटातील काही आमदार जयपूरला परतले आहेत आणि काही लवकरच परत येणार आहेत.