भोपाळ: नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे विमान अखेर भाजपच्या इशाऱ्यानंतर जमिनीवर आले. यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी अप्रत्यक्ष का होईना, पण या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील, असे म्हटले होते. साहजिकच यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तसेच विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. अखेर प्रचंड टीका झाल्यानंतर भाजपने साध्वी प्रज्ञा यांना चांगलेच झापत माफी मागण्याचा आदेश दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. पक्षाने याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी जनतेची जाहीरपणे माफी मागावी, असा आदेशच भाजपकडून देण्यात आला. या इशाऱ्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी अखेर नमती भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, माझ्या पक्षावर माझी निष्ठा आहे. मी भाजपची कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाचे धोरण हेच माझे धोरण असल्याचे सांगत साध्वी यांनी सांगितले.




तत्पूर्वी साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यावर भोपाळ मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील सडकून टीका केली. नथुराम गोडस हा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा मारेकरी होता. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करणे, ही देशभक्ती असू शकत नाही. तो राष्ट्रद्रोहच आहे, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.