पगारवाढीच्या नावाखाली कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसणार पानं; Salary Hike Prediction पाहाच
Salary Hike Prediction : पुढच्या वर्षी किती टक्क्यांनी वाढणार पगार? आकडा पाहून होतोय हिरमोड. नोकरदार वर्गानं अजिबातच टाळू नये अशी माहिती..
Salary Hike Prediction : (Government Jobs) सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध वेतन आयोग आणि सरकारकडून मिळणाऱ्या अनेक सवलतींचा लाभ घेता येतो. पण, (Private Jobs) खासगी क्षेत्रातील कर्मचारी मात्र दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीवर बहुतांशी अवलंबून असतात. दरवर्षीप्रमाणं येत्या आर्थिक वर्षामध्ये आपला पगार किती टक्क्यांनी वाढणार, यासाठीसुद्धा अनेक नोकरदार उत्सुक असतानाच एक आकडेवारी समोर आली आहे. एकंदरच ही आकडेवारी पाहता जागतिक (Recession) आर्थिक मंदी आणि त्याचे परिणाम पाहता अनेक कंपन्या येत्या काळात पुन्हा एकदा पगारवाढीच्या नावावर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताना दिसणार आहे.
ग्लोबल प्रोफेशनल सर्विस फर्म एऑन पीएलसी च्या ‘30व्या अॅन्युअल सॅलरी इंक्रीमेंट अँड बिजनेस सर्वे’नुसार पुढील वर्षात तुमचा पगार किती टक्क्यांनी वाढणार आहे याचा अंदाज वर्तवणारी एक आकडेवारी समोर आली आहे. 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात साधारण 9.5 टक्क्यांची सरासरी वाढ होण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला असून, 2024 मध्ये ही आकडेवारी 9.3 टक्के इतकीच होती. थोडक्यात पगारवाढीचा आकडा फारसा वाढला नसल्यामुळं येत्या काळातही कर्मचाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पगाराचा आकडा मोठा असणाऱ्या वर्गाला या आकडेवारीचा फारसा परिणाम होणार नसला तरीही तुलनेनं कमी पगार असणाऱ्यांची पगारवाढही टक्केवारीनुसार आणि मूळ वेतनानुसार कमीच होणार असल्यामुळं ही आर्थिक सुबत्ता जवळपास मिळूनही न मिळाल्यासारखीच असेल असंही काहींचं मत.
रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किमान दिलासा
इंजिनिअरिंग, मॅन्युफॅ्क्चरिंग आणि रिटेल क्षेत्रामध्ये होणाऱ्या पगारवाढीचा आकडा 10 टक्के इतका असेल, तर आर्थिक क्षेत्रामध्ये ही टक्केवारी 9.9 टक्के इतकी असेल. 2024 मध्ये सुरुवातीचे काही दिवस तांत्रिक क्षेत्रासाठी अतिशय आव्हानात्मक होते ज्यामुळं इथं पगारवाढीचा आकडा 10 टक्क्यांहून कमीच असेल. टेन्कोलॉजी काऊन्सिलिंग आणि सर्विस क्षेत्रामध्ये होणारी पगारवाढ 8.1 टक्क्यांच्या घरात असेल.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उकाडा वाढला, पण...; मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान हवामानात चिंताजनक बदल
अधिकृत माहितीनुसार यंदाच्या वर्षी 16.9 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये हा आकडा 21.4 टक्के इतका होता. नोकरी सोडण्याच्या प्रमाणात झालेली घट पाहता येत्या काळात कंपन्यांनी अंतर्गत विकास, उत्पादन क्षमतेत वाढ आणि दीर्घकालीन लक्ष्य गाठण्यासाठीचे प्रयत्न यावर भर देण्याची संधी संस्थांना मिळत असल्याचं मत सर्वे करणाऱ्या संस्थेकडून मांडण्यात आलं.