सलमान प्रकरणातील जज सह ८७ जजेसची बदली कुणी केली?
सलमान खान काळवीट शिकार प्रकरण ज्यांच्याकडे होतं, त्या प्रकरणातील न्यायाधीशांची बदली झाली आहे.
जोधपूर : सलमान खान काळवीट शिकार प्रकरण ज्यांच्याकडे होतं, त्या प्रकरणातील न्यायाधीशांची बदली झाली आहे. या बदलीवरून चर्चेला उधाण आलं आहे. पण ही बदली नेमकी कुणी केली आणि न्यायाधीशांची बदली कशी होते, हे समजून घेणे महत्वाचे आहे. सलमान खान प्रकरणातील न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह ८७ जजेसच्या बदल्या झाल्या आहेत. ही बदली नेमकी सलमान खानच्या जामीनाची सुनावणी आणि निर्णय आला असताना झाली असल्यामुळे, चर्चेला उधाण आलं आहे. न्यायमूर्ती रवींद्र जोशी यांच्या जागी आता न्यायमूर्ती चंद्रशेखर शर्मा येणार आहेत.
८७ न्यायाधीशांच्या बदलीचा निर्णय
आपल्या देशात जिल्हा न्यायालयं, जिल्हा स्तरावरील न्यायदानाचं काम करतात. संबंधित राज्याचे जिल्हा न्यायलये, ही त्या प्रदेशातील उच्च न्यायालयांतर्गत येतात. म्हणजेच राजस्थानातील ८७ न्यायाधीशांच्या बदलीचा निर्णय हा राजस्थान हायकोर्टाने घेतला आहे. या निर्णय प्रक्रियेत उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांचाही समावेश आहे.
ट्रान्सफर कमेटीत किती आणि कोण-कोण जज सामिल असतील, याचा निर्णय हायकोर्टाचे चीफ जस्टीस यांचा असतो.
जिल्हा न्यायालयं हायकोर्ट अंतर्गत
जिल्हा न्यायालयं आणि सत्र न्यायालयं जिल्ह्याच्या सर्वोच्च न्यायालया अंतर्गत असतात. जिल्हा स्तरावरील जज, राज्य सरकारचे कर्मचारी नसतात. पण त्यांचं वेतन हे राज्य सरकारच्या तिजोरीतून होतं. तसेच या न्यायाधीशांचं वेतन न्यायिक वेतन आयोग ठरवतो, राज्य सरकार नाही.
बदलीची शिफारस मान्य करण्याचा अधिकार
राज्य सरकार एखाद्या जिल्हा किंवा सत्र न्यायाधीशाच्या बदलीची शिफारस करू शकतं, पण न्याय प्रमुख हायकोर्टचे चीफ जस्टीस असतात आणि अखेर तेच ठरवतात की ती शिफारस मान्य करायची किंवा नाही.
न्यायपालिका एक स्वतंत्र संस्था आहे. यामुळे न्यायाधीशांच्या बदलीत सरकारची कोणतीही भूमिका नसते.