`येत्या सहा महिन्यांत उभं राहणार राम मंदिर`
`येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण राम मंदिर पाहू शकू`
नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापवला जातोय. आता पुन्हा एकदा एका खासदारानं राम मंदिर बनवण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. मध्यप्रदेशचे समाजवादी पक्षाचे खासदार सुरेंद्र सिंह नागर यांनी एका कार्यक्रमात बोलताना 'मी रामभक्त आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण राम मंदिर पाहू शकू, असं मला वाटतं. येत्या ३ ते ६ महिन्यांमध्ये अयोध्येत राम मंदिर उभारलं जाईल' असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एक नवा वाद उभा राहिलाय.
निवडणुकीत सर्वच पक्षांकडून राम मंदिराचा मुद्दा उचलण्यात येईल, भाजपनं केंद्रातील आपले साडे चार वर्ष पूर्ण केलेत... केंद्रात आणि राज्यात सत्ता आली तर आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. परंतु, निवडणुकीपूर्वी काही महिने उरले असताना आता त्यांना राम मंदिराची आठवण होतेय, असंही नागर यांनी म्हटलंय.
शनिवारी उन्नावचे भाजप खासदार यांनीही आपल्याच पक्षाला धमकी दिली होती. २०१९ पूर्वी राम मंदिर उभं राहिलं नाही तर आपण भाजपसोबत उभे राहणार नाही कारण याच मुद्यावर तर आपण संतांसोबत उभे आहोत, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं होतं.
तर शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही 'जेव्हा अयोध्येत वादग्रस्त बांधकाम पाडण्यासाठी कोर्टाची परवानगी घेतली गेली नव्हती तर राम मंदिराच्या निर्माणासाठी कोर्टाची परवानगी का लागते? ही श्रद्धेची गोष्ट आहे. दिवाळीनंतर लाखो शिवसैनिक मिळून राम मंदिराची उभारणी सुरू करतील' असं म्हणत वादाला फोडणी दिली होती.