नवी दिल्ली: समाजवादी पक्षाकडून शुक्रवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे. बदायू मतदारसंघातून धर्मेंद्र यादव, फिरोजाबादमधून अक्षय यादव, बहराईचमधून शब्बीर वाल्मिकी, रॉबर्टसगंजमधून भाईलाल कोल, इटावातून कमलेश कठेरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुलायमसिंह यादव यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आझमगढचे विद्यमान खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आझमगढ आणि मैनपूरी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 'सपा'कडून आज महिला दिनाचा मुहूर्त साधून दुसरी यादीदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यांना कन्नौजमधून पुन्हा उमेदवारी मिळू शकते. तर लखीमपूर येथून राज्यसभा खासदार रवि वर्मा यांची कन्या पूर्वी वर्मा आणि हरदोईमधून उषा वर्मा यांना उमेदवारी मिळू शकते. 



तत्पूर्वी गुरुवारी काँग्रेसने १५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात उत्तर प्रदेशातल्या ११ आणि गुजरातमधील ४ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद फारुकाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवतील.