सांगली: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक अशा अयोध्या खटल्याचा निकाल जाहीर केला. यावेळी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच पाच एकर पर्यायी जागा देण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयाबाबत समाजाच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात असताना श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे मात्र नाराज आहेत. अनेक वर्षे प्रलंबित असलेला अयोध्या निकाल अखेर लागला. हा निकाल आनंदाचा असला तरी कलंकित आहे. आक्रमकांना पाच एकर जागा देणे हा निर्णयाच्या देहावरचा डाग आहे. तसेच निकालावेळी जारी करण्यात आलेला हायअलर्ट म्हणजे आपले स्वातंत्र्य आणि देशाचे अस्तित्त्व ही भीतीच्या छायेखाली असल्याचे द्योतक आहे. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.


तर दुसरीकडे हा निकाल अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया मुस्लिम पक्षकारांनी दिलीय. कायदेशीर सल्ला घेऊन या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार केला जाईल, असं सुन्नी वक्फ बोर्डाचे पक्षकार जफरयाब जिलानी यांनी सांगितले. 



तर एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय सर्वोच्च असला तरी तो योग्य नाही. आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देऊ. आम्हाला पाच एकर जमीन देणगी म्हणून नको. आम्हाला दुय्यम वागणूक देऊ नका, असे ओवैसी यांनी सांगितले.