राहुल गांधींच्या आकलनशक्तीची कीव येते- सांबित पात्रा
राहुल गांधी यांनी भाषणात `बीईएल`ऐवजी `भेल` असा उल्लेख केला.
नवी दिल्ली: पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आकलनशक्तीची मला कीव येते, असे विधान भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाचा एक व्हीडिओ जोडला आहे.
या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामागे छत्तीसगढमधील सेलफोन घोटाळ्याचा संदर्भ आहे. हे मोबाईल सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून का विकत घेतले नाहीत, असे राहुल गांधींना बोलायचे होते. मात्र, भाषणाच्या ओघात त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या दोन कंपन्यांच्या नावात गल्लत केली. बीईएल ही कंपनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची (ट्राय) सदस्य आहे.
मात्र, राहुल गांधी यांनी भाषणात 'बीईएल'ऐवजी 'भेल' असा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या कंपनीकडून मोबाईल फोन खरेदी का केला नाही, असा सवाल त्यांनी विचारला होता.
यावरुन भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगणाऱ्या व्यक्तीची समज या स्तरावर आहे. हे खरंच एका परिपक्व राजकारण्याचे लक्षण आहे, अशी उपरोधिक टीका सांबित पात्रा यांनी केली.