17 लाख 47 हजारांचं Rolex घड्याळ कुठून आलं? समीर वानखेडेंनी केला खुलासा, `चुकीच्या मार्गाने...`
आर्यन खानवरील (Aryan Khan) कारवाईमुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) नाव चर्चेत आलं होतं. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. दरम्यान `लल्लनटॉप`ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून, प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
आर्यन खानवरील कथित ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drrugs Case) कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या चेन्नईत रुजू आहेत. मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत झोनल डायरेक्टर असणारे समीर वानखेडे बदली होऊन चेन्नईत अतिरिक्त आयुक्त पदावर गेले आहेत. आर्यन खानची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. याशिवाय नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषदा घेत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. समीर वानखेडे यांनी 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
आर्यनसाठी शाहरुखने विनंती केली तेव्हा काय वाटत होतं? समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
समीर वानखेडे यांच्याकडे 17 लाख 40 हजारांचा रोलेक्स घड्याळ आहे. एसआयटीला त्यांनी हे घड्याळ पत्नी क्रांती रेडकरने दिल्याचं सांगितलं होतं. या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, "माझी पत्नी दिग्दर्शक, निर्माता आणि लेखिका आहे. गेल्या 25 वर्षांपासून ती हे काम करत आहे. आम्हाला दोन मुलं आहेत हेदेखील लोकांना माहिती नसेल. तिने सध्या ब्रेक घेतला आहे. एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाइल चांगली असेल तर ते चुकीच्या पद्धतीनेच मिळवलं असेल हा अर्थ नाही. माझी आई शाही कुटुंबातील आहे. सगळा पैसा चुकीच्या मार्गानेच मिळवलेला नसतो".
वयाच्या 17 व्या वर्षी बारचं लायसन्स कसं मिळालं?
वयाच्या 17 व्या वर्षी बारचं लायसन्स मिळण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "हे प्रकरण न्यायालयासमोर आहे. मीडियाला कदाचित माहिती नाही, पण माझी आई एका व्यावसायिक कुटुंबातून आहे. एका व्यावसायिक कुटुंबातून असल्यास तुम्ही युनिफॉर्म घालू शकत नाही. किंवा तुमच्या नावे संपत्ती होऊ शकत नाही हे कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही. मी नागरी सेवेत आलो ही कदाचित माझी चूक असेल," असं त्यांनी म्हटलं.
"नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी तुम्ही कोणतीही वडिलोपार्जित संपत्ती जाहीर केली असेल, तर ती खंडणीच्या पैशातून मिळवली गेली आहे, असं मला वाटत नाही. जेव्हा लोक मला हा प्रश्न विचारतात तेव्हा माझा प्रश्न असतो की तुम्ही असे म्हणत असाल तर याचा अर्थ मी जन्मल्यापासून पैसे उकळत आलो आहे, तेव्हापासून लाच घेत आहे," असं समीर वानखेडे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "जर तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंच, डिनर किंवा कुटुंबासह एखाद्या रेस्तराँमध्ये गेलात तर त्याला बार म्हणणार का? हा बार शब्द बदनामी करण्यासाठी वापरला आहे. हा कौटुंबिक व्यवसाय असून, माझ्या आईच्या नावे होता. तिच्या निधनानंतर तो माझ्याकडे आला आहे".