वाळुच्या शिल्पातून मांडली केरळमधील दुर्दैवी हत्तीणीची वेदना
मानवतेला कलंक ठरलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने निषेध
छपरा, बिहार : केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात फटाक्यांनी भरलेले फळ खाल्याने गर्भवती हत्तीण मृत्युमुखी पडल्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. सेलिब्रिटींपासून ते उद्योगपती रतन टाटांपर्यंत सर्वांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. बिहारमधील एका कलाकाराने केरळमध्ये मृत्युमुखी पडलेल्या हत्तीणीच्या वेदनेला वाळूकलेतून वाट मोकळी करून दिली आहे.
वाळू कलाकार अशोक यांनी वाळूतून साकारलेली हत्तीण आणि तिच्या पोटातील पिल्लू पाहिल्यानंतर केरळमधील मानवतेला कलंक ठरलेल्या घटनेची वेदना तीव्रतेने समोर येते. केरळमधील घटनेला विश्वासघात असं संबोधून वाळू कलाकार अशोक यांनी दुर्दैवी हत्तीणीला न्याय देण्याची मागणी केली आहे.
केरळमधील हत्तीणीच्या मृत्युने संवेदनशील मनं हादरली आहेत. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. गर्भवती आणि भुकेलेल्या हत्तीणीने फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ला आणि त्यानंतर स्फोटाने तिचं तोंड आणि पोटातही वेदना झाली. वेदना आणि भुकेने सैरभैर झालेल्या हत्तीणीने कुणालाही इजा न करता एका नदीच्या पात्रात जाऊन सोंड पाण्यात ठेवली.
वनअधिकाऱ्यांनी त्या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अन्य हत्तींना आणून प्रयत्न केले. पण ती हत्तीण बाहेर यायला तयार झाली नाही. अखेर काही वेळाने तिने पाण्यातच प्राण सोडले.
वनअधिकाऱ्याने सोशल मीडियावर या घटनेबाबत लिहिले तेव्हा या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या घटनेची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. सोशल मीडियावरही या घटनेबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.