नवी दिल्ली: संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे 'जोसेफ गोबेल्स' असल्याची खोचक टिप्पणी भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केली. ते गुरुवारी सीएनएन-न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपमधील सध्याच्या संबंधांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना हिटलरचा सहकारी असलेल्या जोसेफ गोबेल्सची उपमा दिली. संजय राऊत यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणले. त्यांनीच सूर्ययान (आदित्य ठाकरे) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरवायचे असल्याचे म्हटले होते. तोपर्यंत शिवसेनेतील कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्द काढला नव्हता, याकडे राम माधव यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करु शकत नाही - संजय राऊत 


राऊत हे त्यांच्या पक्षाशी कमालीचे एकनिष्ठ आहेत. 'सामना'तून मांडण्यात येणाऱ्या भूमिकेपाठीही तेच असतात. त्यांनी ठाकरे घराण्याचा विश्वास पूर्णपणे जिंकला आहे. ते जणू उद्धव ठाकरे यांचे 'गोबेल्स' आहेत. मात्र, ते कितीही खोट्या गोष्टी पसरवत असले तरी आपण काही जर्मनीत राहत नाही. हा भारत आहे, याठिकाणी तुमचा सामना वेगळ्या धाटणीच्या नेतृत्त्वाशी आहे. राऊत यांनी केलेले दावे खोटे असल्याचे आमच्या नेतृत्त्वाने स्पष्टही केल्याचे राम माधव यांनी सांगितले. 


आदित्यच्या रुपाने सेनेचं 'सूर्ययान' ६ व्या मजल्यावर उतरणार- संजय राऊत


यावेळी राम माधव यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए)  बाहेर पडण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. शिवसेना पुन्हा NDA मध्ये परतेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राम माधव यांनी म्हटले की, शिवसेनेला भविष्यात NDA मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाण्याची शक्यता आता फारच कमी वाटते. शिवसेनेने आमच्या नेत्यांवर नाव घेऊन टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मला पुन्हा समेटाची शक्यता दिसत नाही. शिवसेनेकडूनही तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असे राम माधव यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेसाठी एनडीएचे दरवाजे भाजपकडून कायमचे बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत.