नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेचा धडाका दिल्लीतही सुरूच ठेवलाय. काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतेबाबत काही अटी घातल्याच्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिलंय. 'देशाची राज्यघटनाच धर्मनिरपेक्ष या शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेबाबत आम्हाला कुणी शिवकण्याची गरज नसल्याचं' राऊतांनी म्हटलंय. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत सेल्युलर शब्दावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस संजय राऊत म्हणाले, 'आम्ही संविधानाला मानतो. त्यातच सगळं आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की गीता-कुराणवर हात ठेवून शपथ का घेतली जाते? त्यापेक्षा संविधानाची शपथ घ्यायला पाहिजे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल', असं सांगतानाच 'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी जनतेची इच्छा आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. दिल्लीत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत सत्ता स्थापनेबाबत तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊतांनी हे मत व्यक्त केलं. त्यामुळे महाशिवआघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील, अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय.


महाशिवआघाडीसाठी काँग्रेसची पवारांवर भिस्त


महाशिवआघाडी आकाराला येतेय. या महाशिवआघाडीत काँग्रेस सहभागी होतेय. सध्याची राजकीय स्थिती पाहता शरद पवारांवर विश्वास ठेऊन काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारसरणीच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्याची काँग्रेस नेत्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि अशक्य ते शक्य करतायत शरद पवार...


महाराष्ट्रात जी महाशिवआघाडी आकाराला येतेय तिची पायाभरणी शरद पवारांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार ज्या आक्रमकपणे भाजपाला सामोरे गेले त्यामुळं काँग्रेस श्रेष्ठींचा शरद पवारांवर विश्वास वाढलाय. गैरभाजपा सरकार महाराष्ट्रासारख्या राज्यात आणण्यासाठी पवारांनी पुढाकार घेतला म्हणून सोनिया गांधीही अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. शिवसेनेसोबत सत्तेत जाणं हे काँग्रेससाठी अडचणीचं असलं तरी पवारांनी काँग्रेसला यातले राजकीय फायदे  दाखवून दिले. शिवसेना जर एनडीएतून बाहेर पडली तर महाशिवआघाडीबाबत विचार करू असं त्यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं. 


सोनिया गांधींच्या भेटीत शिवसेनेसोबतच्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही असं सांगून पवारांनी संभ्रम निर्माण केला. पण प्रत्यक्षात काँग्रेस राष्ट्रवादीची वाटचाल महाशिवआघाडीकडं झाली होती. काँग्रेसनं यानंतर अहमद पटेलांना चर्चेसाठी पाठवून अनुकूल असल्याचे स्पष्ट संकेत दिले. महाराष्ट्रात काँग्रेस महाशिवआघाडीसोबत गेली तर त्याचं श्रेय पवारांकडं जातं. काँग्रेस या महाशिवआघाडीत टिकून राहणं सुद्धा पवारांवरच अवलंबून असणार आहे.