PM Modi Would Have Changed 3 Things If..: "देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचे योगदान नसलेले लोक मागच्या दहा वर्षांपासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत व देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर निशाणा साधाला आहे. "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' या लेखामधून करुन दिली आहे.


सरदार पटेलांनी घेतलेली गोळवलकर गुरुजींची शाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“तिरंगा राष्ट्रासाठी अशुभ ठरेल. कारण तीन संख्या हिंदू धर्मासाठी अशुभ असते,” असा तर्क श्री. गोळवलकर गुरुजी यांनी मांडला होता. त्यावर सरदार पटेल यांनी सरसंघचालकांची शाळा घेतली. सरदार म्हणाले, “काय बोलायचे अशा माणसाविषयी? त्यांना हिंदू धर्मच समजू शकला नाही. ज्यांना हे माहीत नाही की, हिंदू धर्माच्या मुख्य देवताच ‘तीन’ आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांना तीन आकडा अशुभ वाटावा हे हिंदू धर्माबाबत त्यांचे अज्ञान आहे.” अशा हिंदू धर्माच्या राजकीय ठेकेदारांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाकडेही पाठ फिरवली. त्यामुळे अयोध्येत चोरांचे व अंधाराचे साम्राज्य पसरले आहे," अशी टीका राऊत यांनी केली आहे.


अयोध्येत अंधार


"लोकसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने मंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव अयोध्येत पार पाडला, पण राम त्यांना पावला नाही. मोदी यांच्या काळात अयोध्येचे नवे राममंदिर गळत आहे व श्रीरामाच्या गर्भगृहात रामाच्या बचावासाठी छत्री धरावी लागत आहे. संपूर्ण अयोध्येत चोरांचे राज्य निर्माण झाले आहे. रामपथावर लावलेल्या 3,800 बाम्बू लाईट आणि 36 गोबो प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले. रामपथावर आज अंधार आहे. जणू रामराज्य भाजपने अंधारात बुडवले. चोरांनी रामालाही सोडले नाही. हे यांचे कायद्याचे राज्य! या राज्याची चौकीदारी मोदी व शहा करीत आहेत," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.


बहुमत गमावलेले पंतप्रधान


"भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बहुमत गमावलेले आपले पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी पुढील तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या," असं म्हणत राऊत यांनी एक यादीच दिली आहे. 


मोदींनी बदलल्या असत्या या 3 गोष्टी


राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार, "मोदींनी 400 जागा जिंकल्या असत्या तर, 1) भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती. 2) संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते. 3) ‘तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते." 2022 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमधील भाजपा आमदार राम कदम यांनी चलनी नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावकरांचे फोटो छापण्याची मागणी करणारी एक पोस्ट केली होती. 


देशात ‘पुतीन पॅटर्न’  लागू केला असता


"या ‘तीन’ महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या असत्या. ‘तीन’ हा आकडा संघ विचारधारा मानणाऱ्यांसाठी अशुभ असला तरी या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या व त्यासाठी तहहयात आपणच पंतप्रधान राहू हा ‘पुतीन पॅटर्न’ लागू करण्यासाठी संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्यविषयक कलमे बदलायलाही त्यांनी पावले टाकली असती, पण भारतीय जनतेने हे होऊ दिले नाही!
सुजाण भारतीय जनतेने तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे व संसदेचे रक्षण केले आहे," असं राऊत म्हणालेत.