Sanjay Raut on PM Modi Degree: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांची शैक्षिणिक पदवी दाखवावी अशी मागणी करणारे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात हायकोर्टाने 25 हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणामुळे पंतप्रधानांची शैक्षिणिक पात्रता पुन्हा चर्चेत आली आहे. असं असतानाच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शिक्षणावरुन पंतप्रधानांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींच्या पदवी प्रमाणपत्राचा म्हणजेच डिग्री सर्टीफिकेटचा फोटो पोस्ट करत हे सर्टिफिकेट नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर लावण्याची मागणी केली आहे. अशी मागणी आपण का करत आहोत हे सुद्धा राऊत यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींची शैक्षिणक पात्रता मागील अनेक वर्षांपासून वादाचा विषय आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमुळे मोदींची शैक्षणिक पदवी ही विरोधकांच्या टीकेचा मुद्दा होत असल्याचं पहायला मिळत आहे. याच विषयावरुन आता राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदींचे डिग्री सर्टीफिकेट राऊत यांनी ट्वीट केला आहे. "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची ही पदवी आहे. लोक म्हणतात की ही पदवी खोटी आहे. मात्र मला वाटतं की 'एन्टायर पॉलिटिकल सायन्स' शोध विषयावर ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे. ही पदवी नव्या संसदभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली पाहिजे. असं केल्याने लोक पंतप्रधानांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत," असा उपहासात्मक टोला राऊत यांनी लगावला आहे.



"जे नवीन ऐतिहासिक आणि क्रांतीकारी संसदभवन बनवलं आहे त्यामध्ये ऐतिहासिक आणि क्रांतीकारी डिग्रीचं प्रमाणपत्रही लावलं पाहिजे. आपल्या पंतप्रधानांचा कर्तृत्व किती आहे हे लोकांना पहायला मिळेल. ते किती मोठे नेते आहेत हे समजेल. यात लपवण्यासारखं काय आहे? यात रहस्य काय आहे? पंतप्रधानांची डिग्री आहे 'एन्टायर पॉलिटिकल सायन्स'ची! कोणी केलं आहे का 'एन्टायर पॉलिटिकल सायन्स'? यावर वाद कुठे सुरु आहे? वाद तर भाजपाचे लोक आहेत. केजरीवाल यांनी या डिग्रीची माहिती मागितली आहे. यात लपवण्यासारखं आणि घाबरण्यासारखं काय आहे? दाखवा डिग्री. खुद्द गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शाहांनी डिग्री दाखवली होती. पुन्हा एकदा दाखवा. जनतेसाठी तरी हे जे नवीन संसदभवन आहे ज्यात सत्यमेव जयते म्हटलं जातं तिथे ही डिग्री लटकवा, असं राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी या ट्वीटसंदर्भात मत मांडताना सांगितलं.