भाजपा खासदाराची आपल्याच पक्षाच्या आमदाराला चपलेने मारहाण (व्हिडीओ)
भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यामध्ये मिटींगमध्येच बाचाबाची झाली.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरमध्ये भाजपा खासदार आणि भाजपाच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. दोघांमध्ये झालेली बाचाबाची इतकी टोकाला गेली की भाजपाच्या खासदाराने स्वत: च्याच पक्षाच्या आमदाराला चप्पलेने मारायला सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करावी केली आणि दोघांना एकमेकांपासून वेगळे केले. या मारहाणीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. विकासच्या परियोजने संदर्भात ही मिटींग सुरू होती आणि मध्येच हाणामारी झाली.
श्रेय घेण्यावरून वाद
भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यामध्ये मिटींगमध्येच बाचाबाची झाली. यानंतर आमदाराने खासदाराला चपलेने मारण्याची भाषा केली. पण याआधीच भडकलेल्या खासदाराने ते कृतीत आणले. स्वत:ची चप्पल काढून तो आमदाराला मारू लागला. आमदाराचा एक हात पकडून त्याला चपलेने डोक्यावर मारायला सुरूवात केली.
श्रेय घेण्यावरून हा वाद सुरू झाला.
भाजपाचे खासदार शरद त्रिपाठी हे संत कबीर नगरचे खासदार आहेत. आमदार राकेश सिंह मेहदावल हे भाजपाचे आमदार आहेत. दोन्ही नेत्यांनी एका मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर श्रेय घेण्यासाठी हा वाद घातला. दरम्यान एकमेकांना शिवीगाळही केली.
कार्यकर्त्यांचा गोंधळ
भाजपाच्या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. आमदारांच्या समर्थकांना या सर्वाचा बदला घ्यायचा होता. आम्ही याचा बदला घेऊनच राहू असे त्यांनी म्हटले.
कुमार विश्वास यांनी उडवली खिल्ली
भाजपा खासदार आणि आमदारांच्या या हाणामारीची कुमार विश्वास यांनी खिल्ली उडवली आहे. एक मजेशिर ट्वीट करुन या घटनेची दखल त्यांनी घेतली. ''दोन राष्ट्रवादी नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. एक खासदार आणि एक आमदार. सीमेवर पाकिस्तानशी लढायला कोण पहिले जाणार ? कदाचित हाच मुद्दा होता. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा. शेवटी वेगवेगळ्या भाषा बोलल्या गेल्या आहेत. 'भारत माता की जय' हा शब्द देखील शेवटी कदाचित ऐकू येईल. असे लोक राज्यसभा आणि लोकसभेत नक्की पाठवत राहा.''