मुंबई : सध्या ट्विटरवर एक हॅशटॅग जबरदस्त ट्रेण्डिंग होतो आहे. तो म्हणजे #sareeTwitter किंवा #SareeSwag म्हणजे थोडक्यात साडी नेसलेले स्वतःचे फोटो अपलोड करणं. साधारणपणे आठवड्याभरापूर्वी हा ट्रेण्ड सुरू झाला. त्यानंतर सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकांच्याही साडी नेसलेल्या फोटोंचा अक्षरशः पाऊस पडला. याची सुरुवात झाली न्यूयॉर्कमधल्या एका मासिकात आलेल्या साडीवरच्या एका लेखामुळे. त्या लेखामध्ये साडीबद्दल फार काही चांगलं लिहिलं नव्हतं. मग काय. साडी म्हणजे काय. त्यात भारतीय स्त्री कशी खुलून दिसते, हे भारतीय महिलांनी ठासून सांगायला सुरुवात केली. त्यात राजकारण क्षेत्रातल्या महिला आघाडीवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगमा, प्रियंका चतुर्वेदी, नुपूर शर्मा यांनी त्यांचे साडीतले फोटो ट्विट केले. या साडी स्वॅगमध्ये प्रियंका गांधीसुद्धा उतरल्या. त्यांनीही लग्नातला साडीमधला फोटो शेअर केला. योगायोगानं १७ जुलैला प्रियंका आणि रॉबर्ट यांच्या लग्नाला बावीस वर्षं झाली. त्याचा फोटोही प्रियंका गांधींनी शेअर केला. 


साडी स्वॅगमध्ये सेलिब्रिटीही मागं नाहीत. यामी गौतम म्हणते साडीमध्ये जे सौंदर्य खुलतं, त्याची तुलनाच नाही. द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमध्ये सोनिया गांधींची भूमिका करणाऱ्या सुझॅन बर्नर्टनंही तिचा फोटो शेअर केला. 


रेणुका शहाणे, टिसका चोप्रा, गुल पनाग यांनीही साडीतले फोटो शेअर केलेत. त्यामुळे ट्विटर सध्या भारतीय पारंपारिक सौंदर्यानं खुलून आणि फुलून गेलं आहे.