EVM घोटाळा : `भाजप नेत्याला ब्लॅकमेल केल्यानंतर माझे 11 सहकारी मारले गेले`
कथित सायबर एक्सपर्ट सैयद शूजाने ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात आणखी खुलासे केले आहेत.
नवी दिल्ली : 2014 मध्ये निवडणूकीत ईव्हीएम मशिन हॅकींग प्रकरणाला आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. आम्ही ईव्हीएम मशिन हॅक करण्यासाठी कोणालाच संपर्क केला नसल्याचे सत्ताधारी आणि विरोधक म्हणत आहेत.दरम्यान अमेरिकेत राहत असलेला भारतीय कथित सायबर एक्सपर्ट सैयद शूजाने ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात आणखी खुलासे केले आहेत. हैदराबादमध्ये माझी टीम एका भाजप नेत्याला भेटली. आम्ही त्याला ब्लॅकमेल केले. त्यानंतर आमचे 11 सहकारी मारले गेले. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शूजाविरोधात दिल्ली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. शुजाने शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.
हॅक न होऊ शकणारे ईव्हीएम मशिन डिझाइन आपण बनवू शकतो का ? अशी विचारण भाजपचे दिवंगत नेता गोपीनाथ मुंडे यांनी माझ्याकडे केली होती. मुंडे नक्की कोण आहेत हे तेव्हा मला माहीत नव्हते. मुंडे स्वत: आपल्या सरकारचा घोटाळा उघड करणार होते. त्यामुळे त्यांची हत्या केल्याचे शूजाने सांगितले. ईव्हीएम मशिन हॅकींगसाठी भाजपा व्यतिरिक्त कॉंग्रेस, सपा, बसपा, आम आदमी पार्टी सहित 11 पक्षांनी माझ्याशी संपर्क केल्याचा आरोपही शूजाने लगावला आहे.
ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीने हॅकर शूजा सोबतचे संबंध नाकारले
एक भारतीय पत्रकार माझ्याकडे आला आणि आपण हे प्रकरण सर्वांसमोर आणू असे त्याने सांगितले. पण त्याने कोणतीही बातमी केली नाही. 'हाऊ डेयर यू' म्हणत तो पत्रकार नेहमी टीव्हीवर दिसतो. गौरी लंकेश यांना देखील याप्रकरणी बातमी करायची होती पण त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान भाजप नेता रविशंकर प्रसाद यांनी याप्रकरणी कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. शूजाने ईव्हीएम प्रकरणी आरोप केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आशिष रे हे एक समर्पित कॉंग्रेसी आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम कॉंग्रेस नियोजित होता. कॉंग्रेसच्या जवळचे आणि त्यांचा प्रचार करणारे यामध्ये सहभागी होते असा आरोपही रविशंकर यांनी केला.