SBI मध्ये तुमचंही खातं आहे का? बँकेकडून खातेधारकांना सतर्कतेचा इशारा, म्हणे...
SBI Alert: खातेधारकांच्या खात्यातील रक्कम... एसबीआयनं इशारा देत नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी
State Bank of India Alert To Customer: देशभरातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि महत्त्वाची आर्थिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेमध्ये भारतातील अनेक नागरिकांची खाती असल्याचं पाहायला मिळतं. पण, याच बँकेकडून सध्या सावधगिरीची पावलं उचलत अनेक खातेधारकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार एसबीयच्या कोट्यवधी खातेधारकांना फसवणुकीचा धोका असल्यामुळं बँकेनं हा इशारा देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या अनेक खातेधारकांच्या खात्यांमध्ये हॅकर डोकावण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या खात्यातील रकमेवर या फसव्या प्रवृत्तींचा डोळा असून या अदृश्य शक्ती दिशाभूल करणाऱ्या मेसेजच्या मदतीनं खातेधाकरांच्या खात्यांतून रक्कम काढत असल्याच्या घटना समोर आल्यामुळं आता थेट सरकारनंच त्यासंदर्भात सतर्क करणारे संदेश जारी केले आहेत.
बँक आणि सरकारच्या वतीनं खातेधारकांच्या खात्यांना असणारा धोका पाहता एक Alert Warning जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये एसबीआयच्या नावे एक फसवा मेसेज सध्या व्हायरल करण्यात येत असून, काही खातेधारकांना बँकेच्या नावे फसवे फोनही केले जात असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. खातेधारकांनी अशा फसव्या फोन आणि मेसेजना बळी न पडता सावधगिरी बाळगावी असं आवाहन सध्या बँक करताना दिसत आहे.
हेसुद्धा वाचा : Konkan Railway : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकीटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी Update; मध्य, पश्चिम रेल्वेनं...
एसबीआय खातेधारकांच्या रिवॉर्ड पॉईंटशी फेरफार करत खातेधारकांना सायबर हल्ल्यांचे शिकार करणारी अनेक मंडळी सध्या सक्रिय असल्यामुळं खातेधारकांच्या हितासाठी सरकार आणि बँकेनं ही पावलं उचलली आहेत.
काय आहे तो फसवा व्हायरल मेसेज?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज बराच व्हायरल झाला असून, त्यामध्ये सातत्यानं नेटबँकिंग, रिवॉर्ड पॉईंट आणि 9980 रुपयांना उल्लेख आढळून येत आहे. हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम करण्यासाठी युजर्सना apk फाइल अपलोड करण्यास सांगण्यात येत असून, एसएमएस, व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून खातेधारकांना हे मेसेज पाठवले जात आहेत.
एसबीआयच्या माहितीनुसार बँकेकडून खातेधारकांना कोणत्याही व्हॉट्सअप किंवा तत्सम पद्धतीनं मेसेज आणि लिंक पाठवल्या जात नाहीत. त्यामुळं असा कोणताही मेसेज मिळाल्यास खातेधारकांनी एसबीआय बँक किंवा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.