SBI खातेधारकांसाठी खुशखबर : अंगठा टेका, पेमेंट करा
पेमेंट करण्यासाठी कार्ड-कॅशची गरज नाही
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेधारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आता छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी, कॅश किंवा कार्ड उपलब्ध नसल्यासही वस्तू खरेदी करता येणार आहे. 'एसबीआय'कडून एक नवीन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या नव्या सुविधेच्या मदतीने, कोणत्याही दुकानातून सामान खरेदी केल्यानंतर अंगठ्याच्या मदतीने पेमेंट करता येऊ शकते.
SBIने BHIM-Aadhaar-SBI platform सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत दुकानदारांना एक अंगठा-थंब स्कॅनिंग मशीन देण्यात येणार आहे. जर ग्राहकाकडे पैसे किंवा कार्ड दोन्हीपैकी काहीही नसेल, तर ग्राहकाला अंगठा स्कॅन करुन पेमेंट करता येऊ शकतं.
SBIने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेसाठी सर्वात आधी खातेधारकाला BHIM-Aadhaar-SBI ऍपद्वारा रजिस्टर करणं आवश्यक असणार आहे. एकदा रजिस्टर झाल्यानंतर खातेधारक, ज्या दुकानात BHIM-Aadhaar-SBI सुविधा उपलब्ध असेल त्याठिकाणाहून पैसे न देता, केवळ थंब स्कॅनिंगद्वारे खरेदी करु शकतात.
या सुविधेसाठी रजिस्टर करताना, नोंदणीकृत खातेधारकांच्या खात्याची आधारकार्डद्वारे पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर बँक, थंब स्कॅनिंग पेमेंटची सुविधा सुरु करेल. पैसे खातेधारकाच्या खात्यातून थेट दिले जातील.
SBIने देशातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानदारांना विनाकॅश किंवा विनाकार्ड पेमेंटच्या सुविधेसाठी बँकेशी संपर्क करण्याचं सांगितलं आहे. बँक अशा दुकानदारांना थंब स्कॅनिंग मशीन उपलब्ध करुन देणार आहे.
SBIची ही नवीन सुविधा ऍन्ड्राइड ऍप स्टोरमधून डाऊनलोड करता येऊ शकत असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी OS v 4.2 - Jelly Bean आणि त्याहून नवीन अपग्रेड व्हर्जन असणं आवश्यक असणार आहे.