SBI कडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, मिनिमम बॅलन्सची अट केली शिथील
भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या नियमात बदल केला आहे. आता मिनिमम बॅलन्सचा टप्पा ५ हजार रूपयांवरून ३ हजार रूपये करण्यात आलाय.
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या नियमात बदल केला आहे. आता मिनिमम बॅलन्सचा टप्पा ५ हजार रूपयांवरून ३ हजार रूपये करण्यात आलाय.
एसबीआयने एप्रिल महिन्यात महिन्याला मिनिमम बॅलन्स न ठेवणा-या ग्राहकांकडून शुल्क आकरणे सुरू केले आहे. यानुसार खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास ग्राहकाकडून १०० रूपये शुल्क आकारले जात आहे. शहरी भागात मासिक मिनिमम बॅलन्स ५ हजार रूपये ठरवण्यात आला होता. यातून पन्नास टक्के रक्कम कमी झाल्यास ५० रूपये शुल्क आकारले जात आहे. तर ७५ टक्के कमी झाल्यास १०० रूपये शुल्क आकारले जात आहे.
ग्रामीण भागात मासिक मिनिमम बॅलन्स १ हजार रूपये ठरवण्यात आला होता. त्यापेक्षा कमी रक्कम झाल्यास त्यावर २० ते ५० रूपये शुल्क आकारले जात होते.
बॅंकेचे प्रबंध निर्देशक रजनीश कुमार यांनी सांगितले की, ‘बॅंकेत ४० कोटींपेक्षा जास्त बचत खाती आहेत. यातील १३ कोती बॅंक खाते बेसिक सेव्हिंग्स बॅंक डिपॉझिट किंवा पंतप्रधान जन-धन योजनेत येतात. या दोन्ही प्रकारच्या खात्यांना मासिक मिनिमम बॅलन्सच्या अटीतून बाहेर ठेवण्यात आले होते. उरलेल्या २७ कोटी खातेदारांपैकी १५ ते २० टक्के खातेदार मासिक मिनिमम बॅलन्स ठेवत नाहीत’.