मुंबई : YES येस बँकेत एसबीआयनं २ हजार ४५० कोटी रुपये गुंतवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येस बँकेची ४९ टक्के मालकी एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जाणार आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर सीईओ आणि तीन संचालक नेमले आहेत. तसंच गुंतवणूकदारांना आपले दोन प्रतिनिधी नेमता येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेच्या पुरुज्जीवाचा आराखडा जाहीर


रिझर्व्ह बँकेच्या अकार्यक्षम देखरेख यंत्रणेचं पितळ येस बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघडं पडलंय. येस बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असूनही, थकीत कर्जाचा आकडा वाढत असूनही बँकतून कर्जवाटपाचा ओघ सातत्याने सुरु होता. वास्तविक परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसल्यावर रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. 


साधारण १५ महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पहिल्यांदा अवाजवी कर्जवाटपाची दखल घेऊन येस बँकेचे सीएमडी राणा कपूर यांना पदावरुन दूर करण्याचे आदेश दिले. पण तोवर जवळपास २लाख ४४ हजार कोटींचं कर्जवाटप झालं होतं. 



दरम्यान, नव्या येस बँकेची मालकी मिळण्यासाठी नव्या गुंतवणूकदाराला अंदाजे अडीच हजार कोटींची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीपैकी साधारण १४०० कोटी रुपये तीन वर्ष काढता येणार नाहीत. त्यामुळे या निकषांवरही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या सर्व प्रकरणात रिझर्व्ह बँक सीईओ आणि तीन स्वतंत्र संचालकांची नेमणूक करेल. तर, गुंतवणूकदाराला आपले दोन प्रतिनिधी नेमता येतील. परिणामी Yes बँकेची ४९ % मालकी एसबीआयकडे राहिल.