नवी दिल्ली : अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आहे. अनिल अंबानी यांनी चार आठवड्यात थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. एरिक्सन इंडियानं ४५३ कोटी रुपये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे बाकी असल्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. न्यायालयानं याचिकेवर सुनावणी करत एरिक्सन इंडियाच्या बाजूनं निर्णय दिला. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अंबानींना एरिक्सनचे पैसे व्याजासकट परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वीडिशची टेलिकॉम कंपनी एरिक्सनने भारतीय उद्योगपती अनिल अंबानींच्या आरकॉम कंपनी विरुद्ध कायदेशीर लढाई सुरु केली होती. एरिक्सनने अनिल अंबानींच्या आरकॉमच्या अखिल भारतीय टेलिकॉम नेटवर्कला ऑपरेट तसेच मॅनेज करण्यासाठी २०१४ साली ७ वर्षाचा करार केला होता. या करारापोटी ५५० कोटी रुपये आरकॉमला एरिक्सनला द्यायचे होते. पण ते दिले गेले नाही. त्यामुळे इरिक्सनने अखेर न्यायालयात धाव घेतली. अनिल अंबानींच्या आरकॉमवर एकूण ४६,००० कोटींचं कर्ज आहे.


याआधी कर्ज फेडण्याचं आरकॉमने मान्य केलं होतं पण तसं होऊ शकलं नाही. याआधी या कंपनीने अनिल अंबानींना देशाबाहेर जाऊ देऊ नये म्हणून देखील याचिका दाखल केली होती. आरकॉमने मुदत देऊनही पैसे परत केले नाहीत.