सीपीएम नेत्यांना काश्मीरमध्ये जाण्यासाठी सशर्त परवानगी
सुप्रीम कोर्टात सध्या काश्मीर संदर्भातील विविध याचिकांवर सुनावणी सुरु आहे.
नवी दिल्ली : अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरात गेलेल्या सीपीएम नेत्यांना विमानतळावरून परतावं लागलं होतं. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने येचुरी यांना काश्मीरात जाण्याची परवानगी दिली आहे. केवळ पक्ष नेत्यास भेटून परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ सीपीएमचे नेते मोहम्मद युसुफ तरंगिनी यांना भेटा, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा आणि तसेच परत या कोणताही गैरप्रकार करू नका असे आदेस सर्वोच्च न्यायायलयाने दिले आहेत.
दुसऱ्या सुनावणीत कायद्याचा अभ्यासक असलेला मोहम्मद अलीम सैयद या विद्यार्थ्यालाही त्याच्या आई-वडीलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनंतनागमध्ये भेटण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तर सैयदच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारला घेण्यास सांगण्यात आली आहे.
याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील काश्मीरमध्ये जाण्याचा आग्रह धरला होता. पण त्यांना देखील जम्मू विमानतळापासून परत दिल्लीला पाठवण्यात आलं होतं. यावर मायावती यांनी देखील काश्मीर प्रश्नावर संयम ठेवण्याचा सल्ला विरोधकांना दिला होता. 'काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत संयम ठेवायला हवा.' असं मायावती यांनी म्हटलं होतं.