Fake Police New scam: सध्या दररोज नवनवा स्कॅम समोर येत असतो. कधी तुम्हाला केबीसीच्या नावाने फोन येऊन अमुकतमूक रक्कम जिंकल्याचे फोन येतात, कधी तुमच्या नावाचे फेसबुक प्रोफाइल बनवून पैसे मागितले जातात तर कधी मोबाईलवर फोन करुन ओटीपी मागून तुमचा बॅंक बॅलेन्स खाली करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे सर्व स्कॅम तुम्हाला जुने वाटू लागतील. तुमची सतर्कता, सजगतेमुळे या सर्व घोटाळ्यातून तुम्ही वाचला असाल तर अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मार्केटमध्ये आता  नवा स्कॅम आलाय. हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं निव्वळ अशक्यच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर स्कॅमर्स करताना दिसतायत. यासंदर्भात एका महिलेने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. स्कॅमर्स लोकं लुटण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतायत, याची माहिती कावेरी नावाच्या युजरने दिली आहे. फेक पोलीस बनून लुटण्याचा प्रयत्न कसा झाला? याची माहिती कावेरी यांनी दिली आहे. 


मला एक अनोळखी नंबरवरुन फोन आला. समोरची व्यक्ती पोलीस असल्याचे सांगत होती. तुमची मुलगी खूप अडचणीत सापडली आहे. तुमच्या मुलीला तिच्या 3 मैत्रिणींसोबत अटक करण्यात आली आहे. त्यांनी आमदाराच्या मुलाचा व्हिडीओ बनवून त्याला धमकी दिली, असे तो तोतया पोलीस सांगत होता. एवढेच नव्हे तर त्याने फोनवर मुलीचा आवाजदेखील ऐकवला. आवाज अगदी तसाच होता. पण बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती. वॉइस ओव्हर करुन आई, मला वाचव, असे मुलगी बोलत असल्याचे भासवले जात होते. त्यामुळे या फोनवर कावेरीला संशय आला. आपल्यासोबत काहीतरी घोटाळा होतोय, हे त्यांच्या हळुहळू लक्षात येऊ लागले. 



पोस्ट होतेय शेअर


यानंतर कावेरीने पोस्ट लिहून आपल्यासोबत घडलेला प्रसंग लिहून काढला. साधारण एक तासापुर्वी माझ्या मोबाईलवर एक फोन आला. मी सहसा फोन उचलत नाही. माहिती नाही का? पण मी या फोन कॉलचे उत्तर दिले. दुसरीकडे एक इसम होता. तो पोलीस कर्मचारी असल्याचे त्याचे म्हणणे होते. तुमची मुलगी के कुठे आहे, हे मला माहिती आहे, असे त्याचे म्हणणे होते. मला माझ्या मुलीशी बोलू दे असे मी त्याला सांगितले. पण तो रागावला आणि वाईट शब्दात अर्वाच्च भाषेत बोलू लागला. आम्ही तिला कुठेतरी घेऊन चाललोय, असे सांगू लागला. 


कावेरीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर 7 लाखांपर्यं युजर्सनी ती पोस्ट पाहिली आहे. लोक यावर कमेंट करत आहेत. तसेच इतरांची अशाप्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. 


यातून वाचण्यासाठी काय कराल?


सध्याच्या जगात खऱ्या-खोट्या फोन कॉल्सची तपासणी करणं खूप कठीण आहे. स्कॅमर्स तुमचे नातेवाईक असल्याचे भासवून बोलतात. हे कॉल्स ओळखणं फार कठीण असतं. स्वत:ला यापासून वाचवायचे असेल तर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास आणि काही घाबरवण्याचा प्रयत्न झाल्यास अलर्ट व्हा. तात्काळ रिप्लाय देऊ नका. फोन कट करा आणि आपला माणूस कुठे आहे,त्याची खात्री करा.