नवी दिल्ली: एखादी हानी भरून काढण्यासाठी काळ हे सर्वोत्तम औषध असते, असे म्हटले जाते. परंतु, दुर्दैवाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेली देशाची हानी कधीच भरून न येण्यासारखी आहे. उलट दिवसेंदिवस या जखमेच्या खुणा अधिकाअधिक उघड्या पडत असल्याचे वक्तव्य देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली. 


मोदी सरकारने घेतलेल्या दुर्भाग्यपूर्ण आणि अविचारी निर्णयाचा आज द्वितीय वर्धापनदिन आहे. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजावर मोठा आघात झाला. याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. 


वय, लिंग, धर्म, व्यवसाय किंवा पंथ असा कोणताही अपवाद नोटाबंदीने केला नाही, देशातील प्रत्येकाला त्याची झळ बसली. काळ सर्व समस्यांवर उत्तम औषध असते, असे म्हटले जाते. परंतु, दुर्दैवाने निश्चलनीकरणाचा निर्णय त्यालाही अपवाद ठरला. या निर्णयामुळे झालेल्या जखमेच्या खुणा दिवसेंदिवस अधिक ठळक होत चालल्याचे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.