बलात्काराला विरोध केल्याने मुख्याध्यापकाने 6 वर्षाच्या मुलीची केली हत्या, मृतदेह कारमध्ये लॉक केला अन् 5 वाजताच...
मुख्याध्यापक गोविंद नट्टने (Principal Govind Natt) मुलीचा मृतदेह दिवसभर कारमध्ये ठेवला होता.
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील 6 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकानेच चिमुरडीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मुलीने लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने मुख्याध्यापकाने चिमुरडीचा गळा दाबून तिला ठार केलं. यानंतर त्याने तिचा मृतदेह शाळेच्या कंपाऊंटमध्ये फेकून दिला, तसंच बॅग आणि शूज वर्गाजवळ ठेवले. पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी गोविंद नट्टला बेड्या ठोकल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी शाळेच्या आवारात सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून तिची हत्या झाल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासासाठी 10 पथकं गठीत करण्यात आल्या होत्या. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितलं की, ती रोज मुख्याध्यापक गोविंद नट्ट यांच्यासह शाळेत जात होती. पोलिसांनी जेव्हा मुख्याध्यापकाची चौकशी केली तेव्हा त्याने आपण तिला शाळेत सोडून नंतर कामावर गेलो होतो असं सांगितलं.
पोलिसांना मुख्याध्यापकाचं म्हणणं पटत नव्हतं. त्यांनी गोविंदचे फोन लोकेशन तपासले असता घटनेच्या दिवशी तो शाळेत फार उशिरा आला होता हे उघड झालं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
"त्याने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी मुलीला घरातून नेलं. तिच्या आईने मुलीला मुख्याध्यापकाच्या गाडीत बसवललं होतं. पण मुलगी शाळेत पोहोचलीच नव्हती. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याला दुजोरा दिला आहे. शाळेत जात असताना मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलीची आरडाओरड थांबवण्यासाठी त्याने गळा दाबून तिला ठार केलं," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकाने मुलीचा मृतदेह कारमध्येच ठेवला होता. "5 वाजण्याच्या सुमारास त्याने शाळेच्या मागे मुलीचा मृतदेह फेकून दिला. तसंच तिची बॅग आणि शूज वर्गाच्या बाहेर ठेवले. त्याने सुरुवातीला आरोप फेटाळले होते. पण तांत्रिक बाबी तपासल्यानंतर आमचा संशय बळावला," असंही त्यांनी सांगितलं. गोविंदविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे कठोर संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.