नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या ८६ लाख ८३ हजार ९१७ वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केला. मात्र आता अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत होत आहे. अनेक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहे. केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्णय राज्य सरकारवर सोपवले आहेत. तर काही राज्यामध्ये दिवाळीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की दिवाळीनंतर आम्ही योग्य ती खबरदारी घेत शाळा पुन्हा उघडण्याच्या विचारात आहोत. मात्र पुढील आदेश येईपर्यंत राजधानी दिल्लीमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्लीमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्यामुळे पुढचे काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 



दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत राष्ट्रीय राजधानीतील सर्व शाळा बंद राहतील. असं ते म्हणाले. तर राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा सध्या बंद ठेवण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारने देखील घेतला आहे. 


आंध्र प्रदेशमध्ये सात महिन्यांनंतर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. २ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तर २३ नोव्हेंबरपासुन ६वी ते ८वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील. 


आसाममध्ये २ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातील फक्त सहावी ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.